पुसद : तुंबलेल्या नाल्यांमुळे शेकडो लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहे. यानंतरही पालिका प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. मान्सूनपूर्व करावयाची कामे ही पालिका विसरलीच आहे. एवढेच नव्हे तर शहरातून वाहणारी पूस नदीही आता नालासदृश झाली आहे. यावर्षी तरी मान्सूनपूर्व कामांसाठी पालिकेला मुहूर्त सापडणार की नाही, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या काँक्रीट नाल्या कचऱ्याने बुजल्या आहेत. उताराचा भाग असलेल्या वसाहतींमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण गावातील कचरा याच ठिकाणी येवून अडतो. हीच बाब पावसाळ््यात शेकडो नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. एवढेच काय मोठ्या प्रमाणात नुकसानीची झळही त्यांना सोसावी लागते. साधारणत: मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच बहुतांश नगरपालिका मान्सूनपूर्व कामांना हात घालते. स्थानिक नगरपरिषद मात्र अजूनतरी या दृष्टीने कामी लागल्याचे दिसत नाही. गतवर्षी ही कामे झालीच नाही, त्यामुळे याही वर्षी हीच स्थिती राहिल्यास नवल वाटू नये. उताराच्या भागात असलेल्या शिवाजी वार्ड, सुभाष वार्ड, आंबेडकर वार्ड आदी भागातील नागरिकांना प्रत्येक पावसाळ््यात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. घरात पाणी शिरते, अंगणातील पाणी कित्येक दिवसपर्यंत वाहून जात नाही. त्यामुळे सुटलेल्या दुर्गंधीमुळे जीवघेणे आजार बळावण्याची भीती असते. केवळ तुंबलेल्या नाल्यांमुळे हा प्रकार घडतो. या संदर्भात नगरसेवकांकडे तक्रार केल्यास चालढकल केली जाते. पदाधिकारी आणि प्रशासनही गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे समस्या मांडायची कुणाकडे, हा सवाल नागरिकांचा आहे. शहरातून वाहणारी पूस नदी बेशरमांची झाडे आणि जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. मोठे पात्र असलेल्या या नदीला आता नाल्याचे स्वरूप आले आहे. गटाराचे पाणी या नदीमध्ये सोडले जाते. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे लगतच्या परिसरातील नागरिकांना जीवघेण्या यातना सहन कराव्या लागतात. यानंतरही संबंधितांकडून ठोस अशा उपाययोजना हाती घेतल्या जात नाही. (प्रतिनिधी)
पुसद नगरपरिषदेला मान्सूनपूर्व कामांचा विसर
By admin | Updated: May 7, 2015 01:53 IST