ऑनलाईन लोकमतवणी : तालुक्यातील पेटुर येथे गेल्या १० ते १२ वर्षापासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. यावर्षीही गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी मंगळवारी येथील पंचायत समितीत ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी तब्बल एक तास गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.पेटुर येथील महिलांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत अनेकदा महिलांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे लक्ष देण्यात न आल्याने अखेर महिलांनी पंचायत समितीवरच धडक दिली. तालुक्यातील मानकी येथील शाळेजवळ बोअरवेल खोदण्यात आला असून तेथे मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या गावचे अंतर केवळ तीन किलोमीटर असून तेथून पाईपलाईन टाकून पेटुरला पाणी आणावे, अशी मागणी महिलांनी २ फेब्रुवारी रोजी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली होती. मात्र तेव्हापासून या निवेदनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी पंचायात समितीत ठिय्या आंदोलन केले.यावेळी ५० ते ६० महिलांनी गटविकास अधिकारी राजेश गायनार यांना घेराव घातला. यावेळी गायनार यांनीही महिलांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे महिला पुन्हा संतप्त झाल्या. अखेर दोन तासानंतर उपसभापती संजय पिंपळशेंडे यांनी मध्यस्थी करून महिलांची समजूत काढली. तसेच गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करू, असे ठोस आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच पाईपलाईन टाकण्याचेही आश्वासन यावेळी देण्यात आले.
पाण्यासाठी पेटुरच्या महिलांचा वणी पंचायत समितीत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:34 IST
तालुक्यातील पेटुर येथे गेल्या १० ते १२ वर्षापासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. यावर्षीही गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी .......
पाण्यासाठी पेटुरच्या महिलांचा वणी पंचायत समितीत ठिय्या
ठळक मुद्दे१० वर्षांपासून पाणी प्रश्न सुटेना : बीडीओंना घातला एक तास घेराव