उपनिबंधकांची स्पष्टोक्ती : शेतकऱ्यांना दिलासा, राज्य हस्तक्षेप योजना लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : तूर खरेदी तूर्तास सुरूच राहणार, अशी माहती जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी ‘लोकमत’ला दिली. ३१ मे हा तूर खरेदीचा शेवटचा दिवस होता, असे समजून शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी गर्दी केली होती. परंतु नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या तूर खेरदीचा हा शेवटचा दिवस होता. राज्य शासनाने यापूर्वी २६ मे रोजी काढलेल्या नवीन आदेशानुसार पणन महासंघाच्या राज्य हस्तक्षेप योजनेअंतर्गत तूर खरेदी सुरूच राहणार आहे. ३१ मे हा तूर खरेदीचा शेवटचा दिवस राहणार असल्याचे समजून अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. कारण अद्याप मोठ्या प्रमाणात तूर शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणताही स्पष्ट खुलासा यापूर्वी करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. राज्य शासनाच्या २६ मे च्या आदेशानुसार तूर खरेदी सुरूच राहणार आहे. नवीन आदेशात खरेदी बंद करण्याची तारीख नाही. त्यामुळे टोकण देणे आणि तूर खरेदी जिल्हाभर सध्या सुरूच आहे. - अर्चना माळवे, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ
तूर खरेदी तूर्तास सुरूच राहिल
By admin | Updated: June 1, 2017 00:13 IST