तालुका वार्तापत्र
मुकेश इंगोले
दारव्हा : तालुक्यात राजकीय पक्षांनी विविध मार्गाने जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. काँग्रेस वगळता कुणीही प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घेतला नाही. मात्र, जनसंपर्काच्या माध्यमातून सर्वांचीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सध्या तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद सदस्य, १०पैकी ९ पंचायत समिती सदस्य, ८ नगरसेवकांसह नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत. काँग्रेसचे ४ नगरसेवक असून भाजपचे उपनगराध्यक्षांसह ४ नगरसेवक, समाजवादी पक्ष २ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. येत्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व कायम राहते, की इतर पक्ष बाजी मारतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले. या माध्यमातून प्रत्येक गावात कार्यक्रम घेऊन शासन, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला जात आहे. शिवाय तालुक्याला देण्यात आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती पदाच्या संधीचा उपयोग संघटन अधिक मजबूत करण्यासाठी करून घेतला जात आहे. शिवसेनेच्या राजकारणाचा आमदार संजय राठोड हे केंद्रबिंदू आहे. ते सध्या तरी प्रत्यक्ष मैदानात उतरले नाहीत. परंतु, त्यांचे इतर कार्यक्रम मात्र सुरू असतात.
काँग्रेसचा आंदोलने तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षाने निवडणुकीच्या तयारीसाठी मेळावा घेऊन रणशिंग फुंकले आहे. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण चढले आहे.
भाजपाच्यावतीने नुकताच मोठा मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गावागावात बुथ समर्थ अभियान सुरू करण्यात आले. दत्तात्रय राहणे यांना पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. याचा पक्षाला किती लाभ होतो, हे निवडणुकीत दिसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची महागाव (कसबा) गटात तयारी सुरू असल्याचे दिसून येते. तसेच पक्षाचे रूटीन कार्यक्रम सुरू असतात. प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर निवडणुकीचे काय नियोजन करतात, यावरच पक्षाचे भविष्य अवलंबून राहणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद राऊत यांनी मागील वेळी बोरी जिल्हा परिषद गटात जोरदार ताकद लावली होती. परंतु त्यांना यश मिळाले नाही. पक्षासह ओबीसी संघटनेच्या माध्यमातून ते सक्रिय आहेत. समाजवादी पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह काही पक्षांचे संघटन तालुक्यात आहे. निवडणुकीच्या दृष्टीने आपापल्या परीने कार्यकर्ते जोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात काहींनी उघड तर काही पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटन वाढवण्यावर भर दिला असल्याचे सध्याचे चित्र आहे.
बाॅक्स
निवेदने, तक्रारी, आंदोलनात झाली वाढ
तालुक्यात काही दिवसात निवेदने, तक्रारी, विविध प्रकारच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियावर आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. ही निवडणुकीची चाहूल असल्याचे स्पष्ट होत आहे. जसजशी तारीख जवळ येईल, तसतशी या प्रकारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हा मुकाबला अतिशय रंजक होण्याची शक्यता आहे.