फोटो
पुसद : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेत तालुक्यातील लाभार्थ्यांना जमीन वाटप करण्यात आली. मात्र, काही लाभार्थ्यांना जमीन मिळाली नाही. त्यासाठी त्वरित निधी देण्याची मागणी रिपाइंने (आठवले) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना सुरू केली. यात भूमिहीन मागासवर्गीय लाभार्थ्यांना दोन एकर ओलित व चार एकर कोरडवाहू जमीन दिली जाते. मात्र, तीन-चार वर्षांपासून सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात अनेक प्रकरणे धूळ खात पडून आहेत. एकूण २०८ प्रकरणांचा निधी बाकी आहे. त्यामुळे निधी त्वरित देण्याची मागणी रिपाइंने केली आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाठोरे, शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, प्रा. अंबादास वानखेडे, भीमराव कांबळे, कैलास श्रावणे, प्रेम ठोके, अमर पाटील, समाधान केवटे, गणपत गव्हाळे, हिरामण हाडसे, प्रकाश धुळे, जयराम माथने, वसंता वाघमारे, दिलीप धुळे, संजय चव्हाण, प्रभू केवटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.