रूपेश उत्तरवार यवतमाळ खासगी शाळांसोबत स्पर्धा करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्वशिक्षा अभियानाकडे डिजीटल स्कूल संदर्भात पाठविलेला प्रस्ताव चक्क फेटाळून लावला आहे. त्यासोबतच सोलर पॅनल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगलाही नकार घंटा दिला असून जणू सर्वशिक्षा अभियानाने शिक्षण विभागाचे हातच बांधले आहे.सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी प्राथमिक शिक्षणाचे आर्थिक बजेट केंद्र शासन मंजूर करते. कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. यावर्षी जिल्ह्याने १२२ कोटींचा प्रस्ताव सर्वशिक्षा अभियानाकडे सादर केला होता. यातील ५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ६४ कोटींचे प्रस्ताव फेटाळण्यात आले. महत्वाच्या तरतुदीचा समावेश होता. यामध्ये डिजीटल स्कूल या महत्त्वाकांक्षी प्रयोगासोबतच सोलर पॅनल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचाही समावेश आहे.जिल्हा परिषदेने खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासोबतच गुणवत्ता वाढविण्यासाठी पाऊल उचलले आहे. यासाठी १६ तालुक्यात डिजीटल स्कूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने सादर केला आहे. विशेष म्हणजे काही प्राथमिक शाळांनी स्थानिक पातळीवर निधी गोळा करून डिजीटल स्कूल सुरू केले आहे. तर काही शिक्षकांनी स्वत: वर्गणी गोळा करून डिजीटल स्कूल सुरू केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र यातून प्रत्येक शाळेत डिजीटल स्कूल उभारणे शक्य नाही. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर १६ तालुक्यात डिजीटल स्कूल उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविला. मात्र हा प्रस्तावच सर्वशिक्षा अभियाने फेटाळून लावला. यामुळे शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात भारनियमन होत असल्याने शाळातील संगणक धूळ खात पडले आहे. विद्यार्थ्यांना संगणक शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सोलर पॅनलचा पर्याय पुढे आला. मात्र तोही प्रस्ताव फेटाळण्यात आला. यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीही निधी मागण्यात आला. परंतु जलपुनर्भरणालाही ठेंगा दाखविला आहे.
सर्वशिक्षाने फेटाळला डिजीटल स्कूलचा प्रस्ताव
By admin | Updated: August 17, 2015 02:31 IST