पुसदकरांना पर्वणी : तरुणाईच्या जल्लोषाला येणार उधाण, उत्साहात सुरू आहे सरावपुसद : वैशिष्ट्यपूर्ण ढोल वादन गणेशोत्सवातील मोठे आकर्षण असते. गेल्या काही वर्षात डीजे संस्कृती चांगलीच फोफावली असताना ढोल-ताशांचा थरार अद्यापही अंगावर रोमांच उभे करतो. आजवर ढोल-ताशांच्या नृत्यासाठी केवळ पुणे व मुंबईतील वादकांचीच चलती होती. आता मात्र विदर्भातही मोठ्या प्रमाणात ढोल-ताशांचे पथक निर्माण झाले आहे. पुसदमध्ये देखील ढोल-ताशांच्या पथकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. ही चुरस यावर्षीच्या गणेशोत्सवात दिसून येणार आहे. सध्या शहरातील अनेक ठिकाणी या ढोल-ताशांच्या पथकांचा तासंतास सराव सुरू आहे. या पथकांमध्ये १०० हून अधिक तरुण-तरुणींचा समावेश दिसून येत आहे. युवा जल्लोष पथकामध्ये ५० ढोल, १२ ताशे, २० झांजा, ५० लेझीम आदी साहित्यांचा समावेश आहे. तर हिंदू गर्जना पथकामध्ये ५० युवकांचा जोरदार सराव सुरू आहे. ही पथके मानधन घेतात, परंतु खर्च वजा जाता संपूर्ण रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरल्या जाते. गणपतीची प्राणप्रतिष्ठाही उत्साहात साजरी केल्या जाते. सुरूवातीला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष होतो. त्यानंतर विविध धार्मिक व चित्रपटातील गीतांवर ताल धरल्या जातो. यामध्ये तरुणांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. सध्या ढोल-ताशे वादकांचा सराव बघता पुसद शहरातील गणेशोत्सव रंगतदार ठरणार असल्याचे दिसत आहे. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
यंदाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा थरार
By admin | Updated: September 14, 2015 02:36 IST