भंगार बस : प्रवाशांना घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधारपांढरकवडा : येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगार विविध समस्यांनी ग्रस्त असून त्याचा प्रवाशांसह व्यावसायीकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवेशद्वाराजवळ खोलगट भाग पडल्याने त्यात पाणी साचून राहते. त्याचा लगतच असलेल्या फळ व इतर व्यावसायीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोबतच बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून तेथे वराह व कुत्रे नेहमी लोळताना दिसून येतात. येथील आगारात जवळपास ५५ बस आहे. त्यापैकी केवळ पाच ते सहा बसची स्थिती चांगली आहे. इतर बसमध्ये काचा, बैठक व्यवस्था, चालकाची सीट तुटलेल्या अवस्थेत आढळून येते. बहुतोश बस भंगार झाल्या आहेत. बस चालकालाच बसण्यासाठी बरोबर जागा नसल्याने त्यांचीही मनस्थिती बिघडते. जास्तीत जास्त बस भंगार झाल्यामुळे त्या मधातच बंद पडणे, नादुरूस्त राहणे, टायर पंक्चर होणे व इतर तांत्रिक बिघाड येत आहे. त्याचा प्रवाशांसह परिवहनच्या कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा प्रवाशांना मधातूनच बस फेल झाल्यामुळे दुसऱ्या एखाद्या खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. यात त्यांचा वेळ व पैसा दोन्हीही वाया जात आहे. याचबरोबर आगारातून ग्रामीण भागात सुटणाऱ्या बसेस वेळेवर लागत नाही. त्यामुळे प्रवाशांना तास न् तास बसची प्रतीक्षा करावी लागते. वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देऊन प्रवाशांना चांगल्या बसची सेवा द्यावी, आगारात स्वच्छता ठेवावी तसेच ग्रामीण फेऱ्या वेळेवर लावाव्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पांढरकवडाचे आगारच समस्याग्रस्त
By admin | Updated: November 7, 2015 02:48 IST