लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या तीन वर्षांपासून रखडलेल्या बदल्यांची प्रक्रिया यंदा राबविली जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी ग्रामविकास खात्याने सीईओ आणि ईओंकडून व्हीसीद्वारे आढावाही घेतला असून, जिल्हा परिषद प्रशासन तयारीला लागले आहे. तसेच बदल्यांसाठी अवघड गावांची यादी आठ दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.हजारो शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा बदल्या करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून गुरुवारी ग्रामविकास खात्याच्या सचिवांनी आढावा घेतला. या व्हीसीमध्ये बदल्यांसाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आता जिल्हा परिषद प्रशासन सेवाज्येष्ठता यादी व अवघड गावांची यादी करण्याच्या कामाला लागले आहे. टीचर ट्रान्स्फर पोर्टलवर शिक्षकांची माहिती त्यांच्या आधार व मोबाइल क्रमांकासह अपडेट करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, यंदा शिक्षकांनी भरलेली माहिती गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर पडताळल्यानंतरच एनआयसीकडे जाणार आहे. ही प्रक्रिया करण्यापूर्वी २५ मार्चपर्यंत युडायस क्रमांक अपडेट करणे, शाळा नोंदणी दुरुस्ती करणे, शिक्षक डाटा चेक करणे, एप्रिलपूर्वी अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे, २५ एप्रिलपर्यंत समानीकरण धोरण जाहीर करणे, १५ एप्रिलपर्यंत रोस्टर अपडेट करणे यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.
सव्वाशे गावांची यादी तयार, आणखी भर पडणार- शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी अवघड गावांची यादी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यासाठी सात निकष ठरविण्यात आले आहे. नक्षलग्रस्त क्षेत्रातील गाव, दूरध्वनी सेवा नसलेले गाव, राज्य मार्गापासून दहा किलोमीटरपर्यंत दूर असलेले गाव, अत्यल्प पर्जन्यमान असलेले गाव, जंगल क्षेत्रातील व हिंस्त्रप्राण्यांचा उपद्रव असलेले गाव अवघड क्षेत्राच्या यादीत समाविष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेने मागील वर्षी १२४ गावांची यादी तयार केली आहे. ही यादी यंदाच्या बदली प्रक्रियेसाठी कायम ठेवली जाणार असून नव्या निकषानुसार त्यात जिल्ह्यातील आणखी काही गावांची भर पडणार आहे.
व्हीसीमध्ये मिळालेल्या निर्देशानुसार बदलीप्रक्रियेवर काम सुरू झाले आहे. काही शिक्षकांचे जुने मोबाईल नंबर बदलले आहे. ते पोर्टलवर अपडेट करणे, आधार लिंक करणे ही कामे आधी करावी लागणार आहे. ३१ मार्चपूर्वी अवघड क्षेत्राची यादी जाहीर होईल. - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी
सर्व संघटना आग्रही - शिक्षकांची बदली प्रक्रिया तीन वर्षांपासून सतत रखडत आहे. त्यामुळे यंदा सर्वच शिक्षक संघटना बदल्यांसाठी आग्रही आहे. मधुकर काठोळे, इब्टाचे दिवाकर राऊत, कुलदीप डंभारे तसेच शिक्षक समितीनेही आग्रही भूमिका घेतली आहे.