स्वच्छ भारत अभियान : नगरवासीयांचे सहकार्य आवश्यक -वंदना रॉय लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम राबविल्या जात असून या मोहिमेत नगरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष वंदना रॉय यांनी केले आहे. शहरातील नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या सहकार्यानेच नगरविकासाच्या कामात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पांढरकवडा नगरपरिषदेला अमरावती विभागातून उत्कृष्ठ नगरपरिषदेचा व्दितीय क्रमांकाचा एक कोटी रूपयांचा पुरस्कारमिळाला. हा संपुर्ण शहरवासियांचा सन्मान आहे. शासनाच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत नगरपरिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेतसुध्दा नागरिक असेच सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून पावसाने नाल्या तुंबू नये, यासाठी नियमित नाल्या साफ केल्या जात आहेत. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे, असेही त्यांनी सांगीतले. ‘ग्रीन सिटी’साठी जय्यत तयारी खऱ्या अर्थाने पांढरकवडा शहर हे ‘ग्रिन सिटी’ व्हावे अशी आपली मनिषा असून संपुर्ण शहर हिरवेगार करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष वंदना रॉय यांनी सांगितले. मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीदेखील १ जुलैपासून शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणार असून यवतमाळ जिल्ह्यात २३ लाख ७९ हजार वृक्ष लागवडीचे उदिष्ट आहे. पांढरकवडा नगरपरिषदेने देखील शासनाच्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे ठरविले आहे. शहरवासियांच्या सहकार्याने मागीलवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वृक्षारोपनासह लावलेल्या वृक्षाचे संगोपन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या.
पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे धडक स्वच्छता मोहीम
By admin | Updated: June 14, 2017 00:24 IST