महागाव : येथील तहसीलदारांनी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाला अनधिकृत गौण खनिज उत्खनन, अकृषक न करता विनापरवाना जमिनीचा वापर केल्याप्रकरणी तब्बल २५ लाख ७८ हजारांचा दंड ठोठावला.वरोरा ते वरळी दरम्यान पारेषणची लाईन टाकण्याचे काम तालुक्यात सुरू आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडियातर्फे ही ७६५ किलोमीटरची लाईन टाकण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाले. त्यासाठी अनेक शेतात टॉवर उभारले जात आहे. शासनाचे काम असल्याचे सांगून शेतकऱ्यांना धाकदपट करून हे काम सुरू आहे. त्यामुळ शेती पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तहसीलकडे तक्रारी केल्या होत्या. संबंधित तलाठ्याने काम सुरू असल्याची कोणतीही माहिती तहसीलला दिली नव्हती. त्यामुळे कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना धमकावून काम करीत होते. यानंतर उटी येथील शेतकरी प्रशांत गावंडे यांनी शेतकऱ्यांसह कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र कंपनीने ती धुडकावून लावली. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्याची दखल घेत तहसीलदार एन.एल. इसाळकर यांनी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना कंपनीच्या कामाचा अहवाल मागितला. तसेचशेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालावरुन तहसीलदारांनी कंपनीला अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि टॉवर उभारणीसाठी जमीन अकृषक न करताच विना परवाना वापर केल्याप्रकरणी २५ लाख ७८ हजार ९८५ रूपयांचा दंड ठोठावला. सोबतच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता कंपनीने शेतकऱ्यांना २० लाख ९१ हजार ५९१ रूपयांची भरपाई मंजूर केली आहे. (शहर प्रतिनिधी)
महागावात पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनला २५ लाख दंड
By admin | Updated: March 26, 2017 01:19 IST