ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 10- कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची झळ अजूनही काही भागात बघायला मिळतं आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दारव्हा बंदची हाक दिली होती. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या दारव्हा बंदला सकाळपासूनच शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी बसस्थानकावर लावलेले मुख्यमंत्र्यांचे कर्जमाफीचे पोस्टर फाडून आपला संताप व्यक्त केला. तसंच बियाण्यांची पाकीटं, फळं, भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध नोंदविला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व्यापारी असोसिएशन यासह विविध पक्ष आणि संस्थांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी शनिवारी बंदची हाक दिली होती. बसस्थानकासमोर रास्तारोको करण्यात आला. या बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी राहुल ठाकरे, उत्तमराव शेळके, रमेश सत्तुरवार यांच्यासह प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी शहरातील प्रमुख मार्गाने फिरून व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं.
सेनेचा सहभाग नाही
शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेनेचा सहभाग राहील, असं आयोजकांच्यावतीने सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्षात सेनेचा एकही कार्यकर्ता या आंदोलनाकडे फिरकला नाही. त्यामुळे राज्यात कर्जमाफीसाठी रान उठविणारी शिवसेना या ठिकाणी का सहभागी झाली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.