यवतमाळ : जिल्ह्यात दूर अंतरावर असलेल्या रेशन दुकानांची तपासणी अपवादानेही होत नसल्याने परवानाधारकांचे चांगलेच फावत आहे. धान्य काळ्याबाजारात जाण्यासोबतच निकृष्टही पुरविण्याचे प्रकार वाढत आहे. गरिबांच्या धान्यावर श्रीमंतवर्गच डल्ला मारत आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या गावांमधील रेशन दुकानांची तपासणीतेवढी संबंधितांकडून केली जाते. आडवळणाऱ्या गावांमध्ये कुठल्याही विभागाचा अधिकारी जात नाही. या प्रकारातच धान्याच्या काळ्याबाजाराचे मूळ आहे. कार्डधारक रेशन दुकानदाराकडे जातात त्यावेळी त्यांना धान्य आले नाही, कमी आले आदी प्रकारची कारणे सांगून परत पाठविले जातात. मात्र धान्य नेमके केव्हा येणार, या विषयी ठोस असे सांगितले जात नाही. हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबाला रेशनचे धान्य मिळविण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यांच्याशी रेशन दुकानदारांची वागणूकही चांगली नसते. तुसडेपणाचा प्रकार त्यांच्याशी केला जातो. धान्य देताना कमी दिल्याचेही प्रकार घडतात. रेशन परवानाधारकाकडे असलेल्या वजनमापाची तपासणीही कुणाकडून केली जात नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना धान्य कमी मिळते. एखाद्या जागरूक नागरिकाने संबंधितांकडे तक्रार केल्यास कारवाई केली जात नाही. उलट तक्रारकर्त्यालाच धाकदपट करण्याचे प्रकार पुढे येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
रेशनच्या धान्यावर धनिकांचा डल्ला
By admin | Updated: November 2, 2015 01:54 IST