४३९ मतदार : काँग्रेस-शिवसेनेत थेट लढत यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. काँग्रेसचे शंकर बडे आणि शिवसेना-भाजपा युतीचे प्रा. तानाजी सावंत यांच्यात थेट लढत होत आहे. सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवारानेही आपला पाठिंबा यापूर्वीच जाहीर केला आहे. जिल्ह्यात विधान परिषदेचे ४३९ मतदार आहेत. त्यामध्ये दहा नगरपालिकांचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायत सदस्य आणि पंचायत समितीच्या सभापतींचा समावेश आहे. महसूल उपविभाग स्तरावर एकूण सात मतदान केंद्र राहणार आहेत. यवतमाळ उपविभागाचे केंद्र हे जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राहणार आहे. २२ नोव्हेंबरला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचे चिन्ह नसून ‘पसंतीक्रमा’नुसार उमेदवाराची निवड करावी लागणार आहे. काँग्रेस व शिवसेनेत थेट लढत असली तरी मतपत्रिकेवर तिसरा अपक्ष उमेदवार कायम राहणार आहे. शंकर बडे आणि तानाजी सावंत हे दोनही तुल्यबळ उमेदवार आहेत. दोघांकडूनही विजयाचा दावा केला जात आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला असला तरी अद्यापही त्यांचे ‘तळ्यात की मळ्यात’ सुरू असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे साध्य होईल, असा विचार करून मोठ्याला अंधारात ठेवत लहाना मोर्चेबांधणी करीत असल्याच्या चर्चा आहेत. त्याचा धसका घेऊन शिवसेनेच्या एका नेत्याने शनिवारी सकाळीच राष्ट्रवादीच्या नेत्याचे घर गाठून त्यांच्याकडून संपूर्ण ताकदीनिशी सेनेच्या पाठीशी राहणार असल्याचा शब्द घेतल्याची माहिती आहे. मतदारसंख्या ४३९ असली तरी काँग्रेस व शिवसेना या दोनही पक्षांकडून ‘तीनशे प्लस’चा दावा केला जात असल्याने नेमका कुणाला धोका होणार याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. बहुतांश मतदारांनी दोनही उमेदवारांशी ‘हातमिळवणी’ केली आहे. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ते नेमके कुणाच्या पारड्यात आपला ‘पसंतीक्रम’ टाकतात यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी) काँग्रेसची पत्रपरिषद शुक्रवारी सायंकाळी काँग्रेस नेत्यांनी पक्ष कार्यालयात पत्रपरिषद घेऊन शंकर बडे रिंगणात कायम असल्याचे व तेच निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. बडे यांनी माघार घेतल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. परंतु त्यात कवडीचेही तथ्य नसून ते अखेरपर्यंत सेनेला लढत देतील आणि विजयी होतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले.काँग्रेसचे शंकर बडे हे आपण मतदारांपैकीच एक आणि ‘स्थानिक’ आहोत यावर भर देत असून याच बळावर विजय प्राप्त करू, असा त्यांचा दावा आहे. अनेक पक्षीय मतदारांनी फुटीचे संकेत देत ‘स्थानिका’ला प्राधान्य देण्याची तयारी दर्शविली आहे.शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत यांनीही केंद्रात व राज्यातील सत्तेच्या बळावर जिल्ह्याचा कायापालट करू, युती मजबूत करू आणि जनतेच्या कसोटीत खरे उतरु , असा विश्वास व्यक्त करीत भरघोस मतांनी विजयाचा दावा केला आहे.
विधान परिषदेसाठी आज मतदान
By admin | Updated: November 19, 2016 01:24 IST