आर्णी : नागपूर-तुळजापूर महामार्गावर आर्णी-धनोडा दरम्यान कोसदणीजवळ वाहन तपासणी नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून अवैधपणे वसुली केली जात आहे. खासगी वाहनधारकांना अडवून पोलीस पठाणी वसुली करत आहे. कोसदणी गावाला लागून असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून जड वाहने अडविली जात आहे. वाहनधारकांकडून पैसे उकळण्यासाठी गोरखधंदा कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे. माहूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची वाहने पोलिसांच्या कचाट्यात सापडत आहे. दररोजच्या वसुलीतून हजारो रुपये जमा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या खास कामासाठी पोलीस कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. संबंधित पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात ही पठाणी वसुली सुरू असल्याचे समजते. दिवसेंदिवस महामार्गावरील वाहतूक शाखेचा कारभार ढेपाळत आहे. वाहतूक शाखेच्या वाहनाचा वापर ओल्या पार्टीसाठी कर्मचारी करीत असताना दिसतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. महामार्गावर सतत अपघाताच्या घटना घडत असून वाहतूक शाखेचे कर्मचारी या बाबतीत निष्क्रिय असल्याचे बोलल्या जात आहे. सर्वसामान्यांच्या वाहनांना अडवून मात्र विनाकारण त्रास देण्याचा प्रकार करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेविषयी सर्वसामान्यांमध्ये रोष वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)
महामार्गावर पोलिसांची वसुली
By admin | Updated: September 4, 2015 02:31 IST