दिग्रस : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे दिग्रसचे पोलीस मात्र आपल्या शासकीय वसाहतीतील घरांमध्ये असुक्षित आहेत. ब्रिटिशकालीन पोलीस वसाहत मोडकळीस आली असून अनेक घरांची पडझड झाली आहे. परिणामी ७० च्यावर पोलीस शहरात विविध ठिकाणी भाड्याचे घर घेऊन राहत आहे. या पोलीस वसाहतीचा प्रश्न अद्यापही धूळ खात पडून आहे.दिग्रस शहरात ब्रिटीश काळापासून पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाण्यालगतच त्याच वेळी पोलीस वसाहत बांधण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना तत्काळ उपस्थित राहता यावे, हा त्या मागचा उद्देश होता. आतापर्यंत अनेक जण या वसाहतीत राहत होते. परंतु अलीकडच्या काळात या वसाहतीची अवस्था दयनीय झाली आहे. सध्या पोलीस वसाहतीत ३१ निवासस्थाने असून ठाणेदारांसाठी स्वतंत्र बंगला आहे. या ३१ निवासस्थानात सध्या १५ पोलीस कुटुंबीय जीव मुठीत घेऊन वास्तव्यास आहे. तर उर्वरित ७० पोलीस कर्मचारी या ठिकाणी राहावयास तयार नाही. मूलभूत सुविधा नसल्याने कर्मचारी शहरात भाड्याचे घर घेऊन राहतात. वसाहतीच्या निर्मितीनंतर देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे या वसाहतीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.पोलीस वसाहतीच्या छतावरील कौल फुटून गेले आहे. ठिकठिकाणी तुकडेतुकडे झाले आहे. पावसाळ्यात या निवासस्थानात अक्षरश: धारा लागतात. या वसाहतीत राहणारे कर्मचारी आपल्या घरावर प्लास्टिक टाकून गळणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. छतासारखीच दारे आणि खिडक्यांचीही अवस्था झाली आहे. दार आणि खिडक्या खिळखिळ्या झाल्या असून अनेक वसाहतीची दारे तर लागतच नाही. खिडक्या केवळ नावालाच आहे. या परिसरातील शौचालयही घाणीने बरबटले असून प्रत्येक शौचालयाचे दार तुटलेले आहे. या दारातून सरपटणारे प्राणी आत येण्याची भीती कायम असते. घरांच्या भिंतींना मोठ्ठाले तडे गेले असून भिंती कधी कोसळेल याचा नेम नाही. घरातील फर्शा केव्हाच उखडल्या असून तशीच अवस्था शौचालयाची आहे. नळाचे पाईप ठिकठिकाणी फुटले असल्याने नळाला देखील पाणी येत नाही. शौचालय बंद असल्याने कर्मचाऱ्यांना उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे. या वसाहतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा भिंतही बांधली नाही. सांडपाण्याची व्यवस्थापन होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून घरांच्या आजूबाजूला गाजर गवत उगवले आहे. या गाजर गवतात अनेक विषारी प्राणी दिसतात. परंतु कुणीही याकडे लक्ष देत नाही.(शहर प्रतिनिधी)ब्रिटिशकालीन वसाहतीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष४दिग्रस येथे ब्रिटिशांनी बांधलेल्या या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी जाताना त्यांंना घराचीच काळजी लागली असते. रात्रपाळीतील कर्मचारी तर तासा-दोन तासाला फोन करून ख्याली खुशाली विचारत असतो. घरच सुरक्षित नसेल तर पोलीस जनतेचे काय रक्षण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या वसाहतीच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही त्यावर कोणतीच उपाययोजना झाली नाही. त्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यात नाराजीचा सूर दिसत आहे.
पोलीस वसाहत मोडकळीस
By admin | Updated: September 2, 2015 04:00 IST