घाटंजी : दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. अकरावी आणि पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्रावर गर्दी वाढली. याचाच फायदा घेत सेतू केंद्र चालकांकडून नागरिक आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. कारवाई होत नसल्याने तहसील प्रशासनाचीही या केंद्रावर मेहेरनजर असल्याचे दिसून येते.प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची कागदपत्र मागितली जाते. ही कागदपत्र केवळ सेतू केंद्रावरूनच उपलब्ध होतात. उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञालेख आदी प्रकारची कागदपत्र केवळ सेतू केंद्रावरून उपलब्ध होतात. ही सर्व कागदपत्र देण्याची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ते विद्यार्थी आणि नागरिकांशी उद्धटपणे वागतात. तत्काळ होणाऱ्या कामासाठी वारंवार बोलाविले जाते. येरझारा करताना विद्यार्थ्यांना प्रवासापोटीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सदर सेतू केंद्रात सुविधांचा अभाव आहे. तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या टीन शेडमध्ये कर्मचारी नेमके कुणाच्या अर्जाची तपासणी करून कागदपत्र देतात हे लक्षात येत नाही. एखाद्यामार्फत गेलेल्या व्यक्तीचे कामही अशावेळी केले जाते. प्रत्येक प्रकारच्या कागदपत्रांसाठी शासनाने शुल्क निर्धारित केले आहे. मात्र सदर कर्मचारी यापेक्षा अधिक रकमेची मागणी करत असल्याचा आरोप होत आहे. कागदपत्र तयार होवूनही मागणी पूर्ण होईपर्यंत उपलब्ध करून दिले जात नाही. ही अडवणूक थांबविण्यासाठी तहसील प्रशासनाकडूनही सहकार्य मिळत नाही. सेतू केंद्रातून तयार झालेले कागदपत्र स्वाक्षरीसाठी नायब तहसीलदारांकडे पाठविले जातात. याठिकाणीही कधी अर्ज नेमका केव्हा प्राप्त झाला याविषयीची चौकशी केली जात नाही. एखाद्या विद्यार्थी किंवा नागरिकाने तक्रार केल्यास उद्धट उत्तर दिले जाते. या बाबीकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
घाटंजी येथील सेतू केंद्रावर लूट
By admin | Updated: June 26, 2014 00:03 IST