‘पायका’ गैरव्यवहार : एक लाखांच्या अपहाराचा आरोपयवतमाळ : पंचायत युवा, खेळ, क्रीडा व अभियान (पायका) अंतर्गत क्रीडांगण विकासाच्या निधीत अपहार केल्याप्रकरणी यवतमाळलगतच्या पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच आणि सचिवाविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शासनाच्यावतीने पायका अंतर्गत ग्रामपंचायतींना क्रीडांगण विकासासाठी निधी दिला होता. यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी निधीचा गैरवापर केल्याचे पुढे आले होते. गत आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये एक लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यावरून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय ईश्वरकर यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून तत्कालीन सरपंच चंद्रकला देविदास सिरसाम आणि तत्कालीन सचिव एस.एम. युवनाते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आता पिंपळगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर परिषदेत समाविष्ठ झाली, हे विशेष. (कार्यालय प्रतिनिधी)
पिंपळगावच्या सरपंच-सचिवावर गुन्हा दाखल
By admin | Updated: February 9, 2016 02:07 IST