फुलसावंगी : महागाव तालुक्यातील फुलसावंगी बसस्थानक परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून येथे बसायलाही जागा नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. महागाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी येथे बसस्थानक आहे. या बसस्थानकावर प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. परंतु गत काही दिवसांपासून या बसस्थानक परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. प्रसाधनगृह नसल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील प्रवासी येथे विविध कामांसाठी येतात. येथे आरोग्य केंद्र, बँका आणि बाजारपेठ असल्याने प्रवाशांची गर्दी असते. परंतु सध्या या बसस्थानकाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. बसस्थानकावर येणाऱ्या स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उघडण्याची मागणी केली जात आहे. परंतु बसस्थानकाला पडलेला अतिक्रमणाचा विळखा काढण्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. बसस्थानक परिसरात दररोज होणारी गर्दी पाहता या बसस्थानकाला सुसज्ज करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
फुलसावंगी बसस्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात
By admin | Updated: September 26, 2016 02:47 IST