रेंजर नॉट रिचेबल : ‘हॅमर’पुरते सांभाळले जाते कार्यालय महागाव : काळीदौलत रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग सुरू असताना महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) नॉट रिचेबल आढळून आले. मागील आठ दिवसांपासून महागावचे रेंजर दिग्रस येथे मुक्कामी होते. यावेळी त्यांचा मोबाईलही बंद होता. अधिकारीच मुख्यालयी नसल्यामुळे दोनही रेंजमध्ये सागवानाची अवैध वृक्षतोड आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. पुसद विभागात शासनाचे होत असलेले नुकसान पाहता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युवा व कर्तव्यदक्ष म्हणून ख्याती असलेले उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांची नेमणूक पुसद येथे केली आहे. अरविंद मुंडे पुसद येथे रुजू झाल्यापासून अधिकारी वर्गाने चांगलीच धास्ती घेतली आहे. ते रात्री अपरात्री सर्व परिसर पिंजून काढत आहे. परंतु महागाव-काळी दौलतचे अधिकारी याला अपवाद ठरत आहे. थेट वनमंत्र्यांचे आदेश असतानाही अधिकारी मुख्यालयी न राहता पुसद, दिग्रस येथून आपल्या रेंजचा कारभार पाहतात. परिणामी शासकीय योजना आणि जंगलाच्या सुरक्षिततेवर परिणाम झाला आहे. आठ दिवसांपूर्वी स्वत: मुंडे यांनी रात्री २ वाजता महागाव रेंजरच्या मोबाईलवर कॉल केला असता त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ आला. महागाव, काळीदौलत रेंजमध्ये वर्षाला किमान १२०० मीटर सागवान पट्टी निघत असल्याची माहिती आहे. मालकी पट्ट्यात मिळणारा मार्जीन मनी मीटरला चार हजार रुपये घेण्यात येत असल्याची माहिती एका सागवान ठेकेदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. १२०० मीटर तुटलेल्या सागवानाचे चार हजार रुपये मीटर मार्जीन धरला तरी अलिखित व्यवहारात वर्षाला ४८ लाख रुपयांची उलाढाल सहज होत आहे. या मार्जीन मनीचे पाट मुख्य वनसंरक्षक कार्यालयापर्यंत पोहोचत आहे. परंतु अरविंद मुंडे आल्यापासून या कार्यालयापुरता त्याला ब्रेक लावण्यात आला आहे. महागाव आणि काळीदौलत रेंजरकरिता विशेष सहायक वनसंरक्षक कार्यालय देण्यात आले असून येथील अधिकाऱ्यांची कार्यक्षमता पाहता वरिष्ठांनी पुसदचे सहायक वनसंरक्षक अधिकारी के.पी. धुमाळ यांना महागाव व काळीदौलत रेंजमध्ये लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. दोनही रेंजमधील मालकी पट्ट्यात सागवान वृक्षाची कटाई होत असून तेवढे वृक्ष लावण्याची सक्ती असूनही एकही वृक्ष लावले जात नाही. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. (शहर प्रतिनिधी)
काळी रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग
By admin | Updated: October 27, 2016 01:04 IST