यवतमाळ : पेट्रोलच्या पैशावरून झालेल्या वादात सुरक्षा रक्षकाला दुचाकीवर उचलून नेवून निर्घृण खून करण्याची घटना येथील माळीपुरा परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शहर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीस अटक केल असून एकजण पसार झाला आहे. संतोष सिंगारे (३६) रा. प्रभातनगर असे मृताचे नाव असून तो पांढरकवडा मार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. मंगळवारी रात्री पेट्रोलपंपावर अभिषेक मस्के (२३) व पराग कांबळे (२२) रा. दोघेही माळीपुरा हे पेट्रोल भरण्यासाठी आले. पैशावरून झालेल्या वादात सुरक्षा रक्षक संतोष सिंगारे याला अॅक्टिव्हा दुचाकीवर बसवून माळीपुरा परिसरात आणले. तिथे एका किराणा दुकानासमोर संतोषला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राहुल गायकवाड (३०) रा.अशोकनगर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील पराग कांबळे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पेट्रोलच्या पैशाच्या वादातून हा खून झाला की यामागे आणखी दुसरे कारण आहे, या दिशेने तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
पेट्रोलपंप सुरक्षा रक्षकाचा निर्घृण खून
By admin | Updated: October 13, 2016 00:42 IST