दोन परिषद एकत्र : वटपौर्णिमेच्या दिवशी झुगारली बंधने, आंतरजातीय दाम्पत्य बंधनातवणी : ‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीला अनुसरून दोन विद्यमान लोकप्रतिनिधींनी मंगळवारी सर्व बंधने झुगारून आगळावेगळा आंतरजातीय विवाह केला. या विवाहाने येथील नगरपरिषदेचे आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके आणि जिल्हा परिषद सदस्य अलका टेकाम वटपौर्णिमेच्या दिवशीच सर्व बंधने तोडून एकरूप झाले.तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांनी तालुक्यातील मोहोर्ली येथील कोलाम समाजातील अलका टेकाम नामक युवतीला घोन्सा-चिखलगाव गटातून मनसेच्या उमेदवारीबाबत विचारणा केली. कोलाम बांधव अत्यंत रूढीप्रिय म्हणून ओळखले जातात. मात्र अलकाने आधुनिक युगाची गरज लक्षात घेत सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालविण्यासाठी ही उमेदवारी स्वीकारली. ती विजयी झाली अन् थेट जिल्हा परिषदेत पोहोचली. तेथे तिने आपल्या कार्याची चुणूक दाखविली. यानंतर वणी नगरपरिषदेची निवडणूक झाली. त्यात उंबरकर यांनी रूग्णसेवा केंद्राचे प्रमुख धनंजय त्रिंबके यांना उमेदवारी बहाल केली अन् तेसुद्धा चांगल्या मताधिक्क्याने विजयी झाले. सध्या धनंजय आरोग्य सभापती सोबतच पालिकेत मनसेचे गटनेते आहे. अलका आणि धनंजय एकाच पक्षात आहे. त्यामुळे जनता, नागरिकांच्या समस्या, विकास कामे याबाबत नेहमी त्यांच्यात चर्चा होऊ लागली. या चर्चेतून त्यांना एकमेकांचा स्वभाव कळला अन् कळत-नकळत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हा दुग्धशर्करा योग उंबरकर यांना कळला अन् त्यांनीच त्यांच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. यापूर्वी उंबरकर यांनी जवळपास १५ मुला-मुलींचे लग्न स्वखर्चाने करवून दिले होते. जाती-पातीची बंधणे क्षणार्धात गळून पडली. त्यानंतर धनंजय आणि अलका यांच्या सहमतीने विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र अत्यंत साधेपणाने विवाह करण्याची दोघांचीही मानसिकता होती. त्यामुळे कोणताही गाजावाजा न करता मोजक्या हितचिंतकांच्या उपस्थितीत या दोघांचा मंगळवारी येथील जैताई मंदिरात विवाह सोहळा पार पडला. पाच मंगलाष्टके झाली अन् हे दोघेही वटपौर्णिमेच्या दिवशी लग्न बंधनात अडकले. (कार्यालय प्रतिनिधी)आदर्श लोकप्रतिनिधीसध्या अलका आणि धनंजय दोघेही लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी आदर्श लोकप्रतिनिधीचा पायंडा या विवाहामुळे निर्माण केला आहे. जाती-पातींपेक्षा विचार किती मोठे असतात, हे त्यांनी दर्शवून दिले. त्यांच्या विवाहाने जिल्हा परिषद आणि नगरपरिषद या दोन परिषदा आता एकत्र आल्या आहेत. या दोनही संस्था विकासाच्या केंद्रबिंदू आहेत. आता हे नवदाम्पत्य आपापल्या परिषदेमार्फत लोक कल्याणाचे कार्य अधिक जोमाने करतील, अशी अपेक्षा आहे.
लोकप्रतिनिधींचा आगळावेगळा विवाह
By admin | Updated: June 4, 2015 02:13 IST