४६ कोटींची थकबाकी : चोरून वीज घेणाऱ्यांविरुद्ध कारवाईसुहास सुपासे यवतमाळ थकीत वीज बिलाबाबत वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या वीज ग्राहकांची कायमस्वरुपी वीजजोडणी कापल्या जाते. जिल्ह्यात गेल्या पाच-सहा वर्षात जवळपास पावणेदोन लाख वीज ग्राहकांची कायमस्वरुपी वीज महावितरणकडून कापण्यात आली आहे.जे ग्राहक अनेक महिने वीज बिलाचा भरणाच करीत नाही, अशा ग्राहकांना नोटीस पाठविली जाते. परंतु त्यानंतरही वारंवार पाठपुरावा करून जे ग्राहक वीज बिलाचा भरणा करीत नाही, अशा ग्राहकांची आधी सहा महिन्यांसाठी तात्पुरती वीज कापल्या जाते. तरीदेखील या दरम्यान ग्राहकाने बिलाचा भरणा न केल्यास अशा ग्राहकांची वीज कायमस्वरुपी कापल्या जाते. अशा कायमस्वरुपी वीज कापलेल्या ग्राहकांची जिल्ह्यात एकूण संख्या एक लाख तीन हजार ७२ आहे. यांच्याकडे एकूण थकबाकी ४५ कोटी ७० लाख ७६ हजार ४२४ रुपये आहेत.जिल्ह्यात वीज वितरणचे तीन विभाग आहे. विभागानुसार थकबाकी व ग्राहकांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यवतमाळ विभागात ३७ हजार ८५६ कायमस्वरुपी थकबाकीदारांची वीज कापली असून त्यांच्याकडे १७ कोटी ६६ लाख ५४ हजार १५७ रुपये आहेत. पांढरकवडा विभागात कायमस्वरुपी थकबाकीदार ग्राहक २४ हजार ६७० असून त्यांच्याकडे १२ कोटी ७८ लाख पाच हजार ९०० रुपये आहेत. पुसद विभागात एकूण थकबाकीदार ग्राहक ४० हजार ५४७ आहेत. त्यांच्याकडे एकूण १५ कोटी २६ लाख १६ हजार ६७ रुपये आहे. यामध्ये घरगुती थकबाकीदार ग्राहकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ९२ हजार ६९९ आहे. त्या पाठोपाठ वाणिज्यिक ग्राहकांची संख्या ८३१५, औद्योगिक ग्राहकांची संख्या २०१९, पथदिवे २७ आणि इतर १२ ग्राहक कायमस्वरुपी थकबाकीदार आहेत. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये कृषी व नळयोजनेच्या थकबाकीचा समावेश नाही. हा समावेश केल्यास थकबाकीचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. वीजचोरी पकडण्याचे आव्हानजिल्ह्यात कायमस्वरुपी थकबाकीदार घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ९२ हजार ६९९ आहे. या सर्व ग्राहकांची वीज महावितरणने कायमस्वरुपी कापली आहे. म्हणजे सध्या हे ग्राहक विजेशिवाय राहत आहे किंवा अनधिकृत वीज घेत आहेत अथवा विजेची चोरी करीत आहेत, हेच यातून स्पष्ट होते. अशा सर्व ग्राहकांचा शोध घेण्याची धडक मोहीम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. यात वीज चोरी व नियमबाह्यरित्या वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर योग्य कारवाई करण्याचे संकेत आहेत. अशा वीज चोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.
पावणेदोन लाख ग्राहकांची वीज कायम खंडित
By admin | Updated: October 28, 2016 02:01 IST