सुनील हिरास - दिग्रसआपल्याजवळ जे आहे त्या माध्यमातूनही देशसेवा करता येते, असे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आपल्या भाषणातून सांगायचे. देशासाठी किमान १० मिनिटे तरी द्या असा आग्रह असायचा. अगदी हेच विचार प्रत्यक्ष कृतीत आणून ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची कटिंग करून देण्याचा अभिनव उपक्रम एका तरुणाने हाती घेतला आहे. राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने तो गत १२ वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहे. आतापर्यंत ३५ हजार शालेय मुलांची त्याने मोफत कटिंग केली आहे. सतीश आनंदराव गवळी असे त्याचे नाव. दिग्रस तालुक्यातील डेहणी हे त्याचे गाव. सतीश गवळी गत १२ वर्षांपासून नियमितपणे आपल्या भागातील शाळकरी मुलांच्या कटिंग करून देतोय. तेही अगदी मोफत. निमित्त असते राष्ट्रीय सणाचे. स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिनापूर्वी सतीश परिसरातील एखादी शाळा निवडतो. शिक्षकांशी संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देतो. प्रत्येक वर्गात जाऊन केस वाढलेल्या मुलांची निवड करतो आणि लगेच केशकर्तनाला सुरुवातही ! दहा, वीस, पंचवीस, पन्नास अशी शेकडो मुले कटिंग करून घेण्यासाठी उत्सुक असतात. तेवढ्याच आनंदाने सतीशही त्यांची कटिंग करतो. मुलांची सतीश निव्वळ कटिंगच करीत नाही तर त्यांना स्वच्छता आणि नीटनेटकेपणाबद्दलही माहिती सांगतो. छोटे-छोटे प्रश्न विचारून त्यांना बोलते करतो. अचूक उत्तरे देणाऱ्या मुलांना लेखन साहित्य बक्षीस देतो. कटिंगसाठी आवश्यक साहित्यासोबतच बक्षिसासाठी वही, पेन, रबर, पेन्सीलही तो स्वखर्चाने घेऊन येतो. आतापर्यंत दिग्रस, महागाव, आर्णी तालुक्यातील जिल्हा परिषद, आश्रमशाळा आणि खासगी शाळांमधील मुलांचे केशकर्तन केले. यावर्षी प्रजासत्ताक दिनापूर्वी कांदळी येथील उर्दू व निंबा येथील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे २०० मुलांची कटिंग सतीशने करून दिली. सतीशचा हा उपक्रम तालुक्यात औत्सुक्याचा विषय झाला आहे. राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने सतीशची ही आगळीवेगळी देशसेवाच होय. देशसेवा कशी करायची ? अशा संभ्रमात असणाऱ्या युवकांपुढे सतीशने नवा आदर्शच निर्माण केला आहे.
राष्ट्रीय सणाला गरीब मुलांची मोफत कटिंग करून पेरतोय देशभक्ती
By admin | Updated: January 25, 2015 23:22 IST