दिग्रस : तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांची नाडी बोगस डॉक्टरांच्या हातात सापडली आहे. यातून रुग्णांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन अशा बोगस डॉक्टरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामीण जनतेतून होत आहे.ग्रामीण भागातील गोरगरीब व अशिक्षित रुग्णांना घरपोच आरोग्य सेवा देण्याकडे काही बोगस डॉक्टरांचा कल दिसून येतो. गावातील काही प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींचाही अशा डॉक्टरांना पाठिंबा आहे. आधी प्रतिष्ठितांचा विश्वास संपादन करून नंतर मात्र आपली दुकानदारी चालविण्यावर या डॉक्टरांचा भर आहे. एखाद्याने या बाबत विरोध केल्यास त्याच गावातील इतर लोकांकडून अशा व्यक्तीचा बंदोबस्त करण्याची योजनाही बोगस डॉक्टरांची असते. त्यामुळे कुणी विरोध करण्यास सहजासहजी पुढे येत नाही. तालुक्यातील नागरिकांना उपचारासाठी दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात यावे लागते. अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. हा खर्च प्रत्येकालाच शक्य होत नसल्याने स्थानिक पातळीवरील डॉक्टरांकडून उपचार घेण्यावर नागरिक भर देतात. परंतु हे डॉक्टर किती खरे व किती खोटे याची माहिती कुणालाही नसते. परिस्थितीनुसारच डॉक्टर रुग्णांवर उपचार करून पैसे कमवितात. ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण हे अशिक्षित असतात. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी एखादे इंजेक्शन लावले, गोळ्या दिले की अशा रुग्णांचे मानसिक समाधान होते. यातून बऱ्याचदा अनेकांचा आजारही दूर होतो. अशाच मानसिकतेचा बोगस डॉक्टर लाभ उचलतात. अनेकांनी तालुक्यात विविध ठिकाणी आपले दवाखाने थाटले असून त्याद्वारे ते रुग्णांवर उपचार करतात. अशा डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
रुग्णांची नाडी बोगस डॉक्टरांच्या हाती
By admin | Updated: April 9, 2015 00:01 IST