ब्रेक फेल : नेताजी चौकातील घटना यवतमाळ : एसटी महामंडळाच्या आगाराने जुन्या बसची दुरुस्ती केल्यानंतर ती बस वापरासाठी पुन्हा योग्य आहे की नाही याची तपासणी करण्याकरिता आरटीओकडे नेण्यात आली. बसची तपासणी करून आगाराकडे परतत असताना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता या बसचे नेताजी चौकात अचानक ब्रेक फेल झाले. यात ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत एम.एच.४०-८६०७ ही बस रिपेंट करून तिची पूर्ण दुरुस्ती करण्यात आली. या बसला रस्त्यावर धावण्यासाठी पुन्हा फिटनेस सर्टिफिकेट व पासिंग मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयात नेण्यात आले. त्याकरिता पांढरकवडा डेपोतील उद्धव रामपुरे या चालकाची ड्युटी लावण्यात आली. रामपुरे हे दुपारी बस घेऊन आरटीओ कार्यालयात गेले. तेथे बसची संपूर्ण तपासणी झाल्यानंतर पासिंग झाल्यावर परतत असताना नेताजी चौकात अचानक एसटी बसचे ब्रेक फेल झाले. रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या वृद्ध इसमाला नेताजी भवनासमोरच बसची जोरदार धडक बसली. समोरचे आणि मागचे चाक अंगावरुन गेल्याने या वृद्ध इसमाचा जागेवरच मृत्यू झाला. त्याची ओळख पटू शकली नाही. घटनेनंतर बस चालक उद्धव रामपुरे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याचे रामपुरे यांनी सांगितले. या प्रकरणी वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (कार्यालय प्रतिनिधी)
पासिंग करून आलेल्या बसने वृद्धाला चिरडले
By admin | Updated: September 28, 2016 00:20 IST