नेर : चौकाचौकात विकली जाणारी दारू बंद करावी, या मागणीसाठी तालुक्याच्या माणिकवाडा(धनज) येथील महिलांनी शनिवारी अनोखे आंदोलन केले. टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी काढण्यात आली. एका कार्यकर्त्याने लोटांगण घातले. हा प्रकार लक्ष वेधून घेणारा ठरला. सदर गावात गावठी दारू काढून खुलेआम विकली जाते. या प्रकारामुळे प्रामुख्याने महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. व्यसनाधीन झालेल्या घरातील कर्त्या व्यक्तीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. युवा पिढीही दारूच्या आहारी जात आहे. त्यामुळे गावातून दारू हद्दपार करण्यासाठी महिलांनी धाडसी पाऊल उचलले आहे. यापूर्वी सदर गावातील नागरिकांनी दारूबंदीसाठी नेर तालुका प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले. शिवाय तोंडीही कळविण्यात आले. परंतु कुणीही ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे शनिवारी भर उन्हात महिलांनी पालखी काढली. दरम्यान, गणेश केवटे या कार्यकर्त्याने जवळपास दोन किलोमीटर लोटांगण घातले. पालखी नामदेव महाराज तीर्थस्थानावर विसर्जीत झाली. यानंतर गणेश केवटे याने उपोषण सुरू केले. या आंदोलनात अमजद पठाण, सचिन फोफसे, अतुल खडसे, अशोक पाटेकर, प्रभा वानखडे, प्रभा मेश्राम आदींचा सहभाग होता. दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
दारूबंदीसाठी महिलांनी काढली पालखी
By admin | Updated: May 10, 2015 01:52 IST