शिक्षक झाले आचारी : काळानुसार बदलले शिक्षणाचे रुप चंद्रकांत ठेंगे पुसदमहाभारतात अर्जुनाला जीवनाचे सार सांगताना भगवान श्रीकृष्णाने स्वत:ची विविध रुपे दाखविली. आता आधुनिक काळातील गुरुंच्या विविध रुपांचा परिचय आजच्या शिष्यांना वेळोवेळी येतो. जीवनाचे सार सांगताना स्वत:च्या पेशाच्या उद्देशाची आठवण ठेवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. ज्ञानदान हा मूळ हेतू बाजूला ठेऊन शिक्षकांना कधी खिचडी शिजवावी लागते तर कधी जनगणना, कधी मतदान अधिकारी असे शाळाबाह्य कामाचे ओझे वाहावे लागते. यात गुणवत्तेची खिचडी होत आहे. खेड्यापाड्यातील उपेक्षित गरीब मुला-मुलींना दिले जाणारे शिक्षण व त्याविषयक धोरण, सल्ले देणारे तज्ज्ञ पुण्यात बसून अभ्यासक्रम तयार करतात. त्यानुसार तयार होणारी पारंपारिक कृतीशून्य पोपटपंची आणि त्यात भिरभिरणारे प्राथमिक शिक्षणाची अवस्था बदलविणे गरजेचे झाले आहे. परंतु या रथाचा सारथी असलेला शिक्षकच शाळाबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेला आहे. गुणवत्ता ढासळण्यामागे खापर आता तर कामावर फोडून शिक्षक जबाबदारीतून निसटू पाहत आहेत. परंतु आजही हाडाच्या शिक्षकांची संख्या मोठी आहे आणि त्यांच्याच भरोश्यावर शिक्षणाचा डोल्हारा उभा आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणेमुळे प्रशिक्षणाचा सुद्धा बोजवारा उडाला आहे. ज्ञानग्रहणापेक्षा मनोरंजन व वेळकाढूपणा येथे दिसतो. अधिकाऱ्यांचा कोणताही वचक येथे नसतो. भारंभार अहवाल व सोप्या कामासाठी वारंवार मिटींग यावर आवर घालणे गरजेचे आहे. एखादे देवस्थान प्रसिद्ध व्हावे, गर्दी वाढावी आणि पवित्रता भंग पावावी, असा प्रकार ज्ञानमंदिरात सुरू आहे. खिचडीच्या रुपाने शाळेत पैसे आले. व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होण्यासाठी गटातटाचे राजकारण सुरू झाले. त्या राजकारणात अनेक शिक्षकांचा शिरकाव झाला. खिचडीसोबत भ्रष्टाचार शिजू लागला. ज्ञानाचे बुस्टर डोज देण्यात शिक्षक अपयशी ठरल्याचे सांगून पालकांनी सरकारी शाळांकडे पाठ फिरविली. मात्र त्यानंतरही उपाययोजना होतच नाही. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रीय कार्य म्हणून प्रामाणिकपणे काम केल्यास ज्ञानदानात खंड पडतो, हे नाकारुन चालणार नाही. आता तर ‘सरल’चे काम करण्यास शिक्षक व्यस्त आहे. खासगी शाळांकडे कारकुनी काम करण्यास वेगळी यंत्रणा दिसून येते. परंतु सरकारी शाळातील शिक्षक मात्र याच कामात व्यस्त दिसतात. त्यामुळे येत्या काळात सरकारने प्राथमिक शिक्षणावर दुरोगामी बदल करणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.
शाळाबाह्य कामांचे ओझे, गुणवत्तेची खिचडी
By admin | Updated: September 5, 2015 02:56 IST