जिल्हाधिकाऱ्यांनी दिली स्थगिती : सीओंकडे मागितला तत्काळ अहवालयवतमाळ : शहरातील दलितवस्तीच्या निधीतून साडे सहा कोटींची कामे सुरू करण्यात आली आहे. ही कामे दलितवस्ती बाहेरच्या क्षेत्रात होत असल्याने तात्काळ थांबवावी अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यातील माळीपुरा परिसरात सुरू असलेले काम तात्काळ थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. यासदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्याला अहवाल मागविण्यात आला आहे. दलितवस्ती क्षेत्राबाहेर दलितवस्तीचा निधी वापरला जात आहे. १७ कोटींच्या निधीपैकी साडे सहा कोटींची कामे दलितवस्ती क्षेत्राबाहेर सुरू करण्यात आली. यातील सुलभेवार मार्केटपासून माळीपुरा पूल ते अंबिका नगर-विटभट्टी चौकापर्यंतच्या कामासंदर्भात नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष आनंद गायकवाड यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम तात्काळ थांबवून त्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना १२ जुलै रोजी दिले. त्यानंतरही हे काम सुरूच होते. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या अनुषंगाने स्मरणपत्र देण्यात आले. याच पद्धतीने शहरात इतरत्रही दलितवस्ती बाहेर कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या. त्यामुळे आनंद गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ३०८ अंतर्गत मुख्याधिकाऱ्याविरोधात याचिका दाखल केली. यात शहरातील पाच कामांना तात्काळ थांबविण्याची मागणी केली. ही कामे दलितवस्ती क्षेत्राबाहेर होत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमुद केले. नागरी दलितवस्ती सुधारणा योजनांतर्गत बिगर दलितवस्तीत नियमबाह्य काम केले जात असल्याचे त्यात नमूद केले. यामुळे शासन निर्णयाची पायमल्ली होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी काढलेल्या कामाचे आदेश त्वरित रद्द करावे, अशीही मागणी गायकवाड यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
दलित वस्तीच्या निधीचा नियमबाह्य वापर
By admin | Updated: October 19, 2016 00:37 IST