यवतमाळ : शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी माहूर येथील दत्त शिखर संस्थान परिसरात आंदोलनाची तयारी चालविली असली तरी तेथील शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने या आंदोलनांना विरोध दर्शविला आहे. आंदोलनादरम्यान भाविकांना त्रास होत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, शेतकऱ्यांच्या नावे बंद केलेले पेरेपत्रक द्यावे, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दत्त शिखर संस्थानवर आंदोलनाची तयारी चालविली आहे. मात्र यामुळे संस्थान परिसरातील शांतता भंग होण्याची भीती संस्थानच्या नायब तहसीलदारांनी माहूर पोलिसांना दिलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना विरोध नाही, त्यांनी आंदोलन करावे, मात्र ते संस्थान परिसराऐवजी आॅथिरिटी असलेल्या महसूल प्रशासन कार्यालयापुढे करावे, अशी भूमिका संस्थानच्यावतीने मांडली जात आहे. मागण्या मंजूर करण्याचा अधिकार दत्त शिखर संस्थानकडे नाही. त्यामुळे हा अधिकार असलेल्या प्रशासनाकडे सदर आंदोलन केले जावे, असे संस्थानच्यावतीने कळविण्यात आले आहे. आंदोलनाचे स्थळ बदलवावे म्हणून संस्थानच्या विश्वस्तांनी माहूर पोलिसांनाही सूचित केले आहे. यापूर्वीसुद्धा संस्थान परिसरात आंदोलन केले गेले. त्यामुळे भाविकांना त्रास झाला. आता शेतकऱ्यांनी आंदोलनाचे स्थळ बदलावे, असे विश्वस्तांतर्फे पोलिसांना सुचविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
माहूरच्या संस्थानवरील आंदोलनांना विरोध
By admin | Updated: November 22, 2015 02:46 IST