महसूलचे दुर्लक्ष : रात्री नदीपात्रात वाहने पुसद : पुसद आणि उमरखेड उपविभागातील नदी-नाल्यांमध्ये सध्या रेती तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे. शेकडो वाहनातून रेतीची खुलेआम तस्करी सुरू आहे. अहोरात्र रेती वाहतूक होत असल्याने लिलावापूर्वीच घाट रिकामे होण्याची भीती व्यक्त होत आहे. पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यातील नदी-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती आहे. यावर्षी हिवाळ्यात नदी पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे रेती तस्करांची चांगलीच चांदी होत आहे. वाहन थेट नदी पात्रात उतरविता येत असल्याने तस्करांना सोईचे जात आहे. पैनगंगा, पूस यासह इतर नदी-नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात दिवसाढवळ्या शेकडो वाहने रेती उत्खनन करताना दिसून येतात. तसेच उमरखेड तालुक्यातील बंदी भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रात उत्खनन सुरू आहे. महागाव तालुक्यातील धनोडा येथे तर रेती तस्करांची यात्राच भरलेली असते. यासोबतच इतर नदी व नाल्यातून विना परवाना रेतीची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे या उपविभागातील बहुतांश रेती घाटाचे लिलाव व्हायचे आहे. परंतु त्यापूर्वीच रेती घाट रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. महसूल प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने तस्करांचे चांगभलं होत आहे. (प्रतिनिधी) पथक कुचकामी पुसद आणि उमरखेड उपविभागात रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने पथक निर्माण केले आहे. नायब तहसीलदारांसह तलाठ्यांचा या पथकात समावेश आहे. परंतु केवळ कागदोपत्री कारवाई केली जाते. रस्त्यावर दिसणाऱ्या वाहनांवर कारवाई होते. घाटावर मात्र कधीच कारवाई केली जात नाही.
पुसदमध्ये रेतीची खुलेआम तस्करी
By admin | Updated: January 19, 2017 01:14 IST