यवतमाळ : बुद्ध पौर्णिमेला करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका पट्टेदार वाघाचे अस्तित्व आढळून आले आहे. या अभयारण्यातील चार वाघ चंद्रपूर आणि लगतच्या तेलंगणा राज्यात स्थलांतरित झाल्याचा दावा केला जात आहे. ४ मे रोजी टिपेश्वर आणि निम्न पैनगंगा अभयारण्य दुपारी १२ पासून व्याघ्र गणनेला प्रारंभ झाला. १४८.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेल्या टिपेश्वरमध्ये ३१ मचान या गणनेसाठी उभारण्यात आले होते. गणनेमध्ये वन अधिकाऱ्यांसोबतच इंदोर, नागपूर, पांढरकवडा, यवतमाळ, अमरावती येथील वन्यप्रेमी सहभागी झाले होते. दरम्यान रात्री ८.३० वाजता सहायक वनसंरक्षक बोराळे आणि वन परिक्षेत्र अधिकारी गजेय लांभाटे हे दोन पर्यटकांसह परत येत असताना टिपेश्वर ते सुन्ना रोडवरील कक्ष क्र. ११५ मध्ये पट्टेदार वाघ दृष्टीस पडला. रस्ता ओलांडताना हा वाघ टिपण्यात आला. तब्बल दहा मिनिटे रस्त्यावर या वाघाचे अस्तित्व होते. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत ही व्याघ्र गणना चालली. मात्र केवळ एकाच वाघाचे अस्तित्व आढळून आले. पावसामुळे या व्याघ्र गणनेत काहीसा व्यत्यय निर्माण झाला होता. सन २०१३ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत एक वाघीन आणि तिच्या चार पिलांचे अस्तित्व ट्रॅप कॅमेरामध्ये नोंद झाले होते. मात्र यावेळी एकच वाघ सापडल्याने अन्य वाघ गेले कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांची शिकार तर झाली नाही ना असा संशयही व्यक्त होत आहे. मात्र हे चार वाघ चंद्रपूर जिल्हा आणि लगतच्या तेलंगाणा राज्यात स्थलांतरित झाले असावे, असा अंदाज वन परिक्षेत्र अधिकारी गजेय लांभाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. वाघ दूरपर्यंत स्थलांतरित होऊ शकतो हे पटवून देण्यासाठी लांभाटे यांनी बोर अभयारण्यातील वाघ अमरावतीत स्थलांतरित झाल्याचा दाखला दिला. (जिल्हा प्रतिनिधी)
टिपेश्वर अभयारण्यात केवळ एक पट्टेदार वाघ
By admin | Updated: May 8, 2015 00:11 IST