यवतमाळ : गाव विकासासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे आॅनलाईन मॅपिंग केले जाणार आहे. यासाठी प्रशिक्षकांची जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एमआर सॅक ही संस्था आॅनलाईन मॅपिंग करीत असून यवतमाळ जिल्ह्यातील दोन गावांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४८० गावांचे मॅपिंग होणार आहे. जिल्हा परिषदेकडून अतिशय प्रभावीपणे सूक्ष्म नियोजन आराखड्याचे काम राबविण्यात येत आहे. एमआर सॅक या कंपनीकडून आॅनलाईन मॅपिंग करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील संपूर्ण शासकीय इमारती, पक्के रस्ते, शेत सर्वेनंबर याचा आधार घेऊन मॅपिंग करण्यात येणार आहे. याच नकाशावरून विकास कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक टप्प्यावर कामाचे मूल्यांकन करून मार्गदर्शन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४८० गावांचा सूक्ष्म नियोजन आराखडा पूर्ण झाला आहे. यात आर्णी, घाटंजी, महागाव, झरी, राळेगाव, बाभूळगाव, कळंब तालुक्याचा समावेश आहे. आता पहिला टप्पा पूर्ण केलेल्या गावातील सहायक प्रशिक्षकांकडून इतर गावातील प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी नुकतीच जिल्हा परिषदेच्या सभागृहात दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत २७० सहायक प्रशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी यशदा पुणेचे संचालक सुमेध गुर्जर, अय्यर, युनिसेफचे समन्वयक रमित वासू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, प्रभारी उपमुख्याधिकारी जालंदर पठारे उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ व नेर तालुक्यातील गावांचे सूक्ष्म नियोजन केले जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रशिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. लवकरच आॅनलाईन मॅपिंग करून आराखडा तयार केला जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)दत्तक ग्राम भारीसांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी दत्तक घेतलेल्या भारी गावाचे आॅनलाईन मॅपिंग नुकतेच पार पडले. भारी येथे एमआर सॅक कंपनीकडून मॅपिंग करण्यात आले. या नकाशावरून विकास कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार मूल्यांकन होईल.
सूक्ष्म नियोजनासाठी आॅनलाईन मॅपिंग
By admin | Updated: March 29, 2015 00:02 IST