लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फसवणुकीसाठी कोण कसा फंडा वापरेल, याचा नेम नाही. यवतमाळातील ९०० स्वेअरफूट प्लॉट विक्रीची ऑनलाइन बेवसाईटवर जाहिरात करण्यात आली. ते पाहून नागपुरातील दोन खरेदीदार यवतमाळात पोहोचले. त्यांनी ९०० रुपये प्रति चौरस फूट दराचा प्लॉट हजार रुपये दराने खरेदी केला. दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. एजंटने कमिशनचे ७० हजार मात्र रोख घेतले. नंतर तो धनादेश वटलाच नाही. विश्वनाथ तुकाराम पराते रा. राऊत ले-आऊट बोरीअरब यांचा यवतमाळातील लोहारा परिसरात सप्तश्रृंगीनगरमध्ये प्लॉट विक्रीस होता. पराते यांच्या मुलाने या प्लॉट विक्रीची जाहिरात बेवसाईटवर टाकली. ती जाहिरात पाहून नागपूर येथील बंडू मानकर ऊर्फ प्रकाश बापूरावजी मनवर आणि अश्विन सिद्धार्थ लांडगे यांनी संपर्क केला. या दोघांनीही नंतर यवतमाळ गाठले. यातील बंडू मानकर हा एजंट म्हणून तर अश्विन लांडगे हा ग्राहक म्हणून भेटला. एजंट बंडू मानकर याने विश्वनाथ पराते यांना त्यांचा प्लॉट हजार रुपये दराने विक्री करून देतो त्यातील वरचे १०० रुपये कमिशन म्हणून लागतील, असा प्रस्ताव ठेवला. त्याला पराते यांनी होकार दिला. नंतर खरेदीदार बनलेल्या अश्विन लांडगे याने दोन्ही प्लॉट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. प्लॉटच्या कागदपत्रांची झेरॉक्सही घेतली. इसाराची रक्कम म्हणून दोन लाख रुपयाचा धनादेश पराते यांना दिला. त्यानंतर एजंट बंडू मानकर याने कमिशनची रक्कम मागितली. चौकशी केली असता, बंडू मानकर याने नागपूरमध्ये अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. त्याचे मूळ नाव प्रकाश बापूरावजी मनवर असल्याचेही पुढे आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात कलम ४२०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
बोरीअरब या मूळगावी जावून दिली रोख - पराते यांनी त्यांच्या मूळ गावी बोरी येथे नेवून बंडू मानकर याला ७० हजार रुपये रोख दिले. नागपूर आलेले दोघेही निघून गेले. २७ मे रोजी दोन लाखांचा धनादेश पराते यांनी पत्नीच्या नावे असलेल्या बँक खात्यात वटविण्यास टाकला; मात्र तो धनादेश अनादर झाला. नंतर त्या दोघांशी संपर्क केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली.