कुर्ली : उधारीत ५० हजारांचे सिमेंट खरेदी करून एका ठेकेदाराने धरोहर म्हणून व्यावसायिकाला चक्क बनावट धनादेश दिला. बनावट धनादेश देऊन फसवणूक केल्याचा दोष सिद्ध झाल्याने त्या ठेकेदाराला एक महिना सश्रम कारावास आणि ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचा निकाल घाटंजी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दिला.मुरलीधर ऊर्फ मुन्ना कापसे रा.ताडसावळी असे शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याने कुर्ली येथील डॉ.गोविंद येरावार यांच्याकडून ५० हजार रुपयांचे सिमेंट उधारित घेतले होते. तसेच परताव्याची हमी म्हणून धनादेश येरावार यांना दिला होता. मुदत संपल्याने येरावार यांनी संबंधित धनादेश बँकेत वटविण्यासाठी टाकला तेव्हा धनादेशच बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे येरावार यांनी घाटंजी येथील न्यायालयात ठेकेदार कापसे याच्याविरुद्ध दावा दाखल केला. हा खटला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयापुढे चालला. न्यायालयाने तपासलेल्या साक्षीत दोष सिद्ध झाल्याने आरोपी मुन्ना कापसे याला दंड आणि शिक्षा ठोठावण्यात आली. (वार्ताहर)
ठेकेदाराला एक महिन्याचा कारावास
By admin | Updated: August 22, 2014 00:08 IST