पाथरीची घटना : क्रेनच्या साहाय्याने ट्रक ओढून काढला मृतदेह रुंझा : परस्पर विरुद्ध दिशेने येणारे दोन ट्रक एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील पाथरी गावाजवळ बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडला. किसना रामराव मेहडे (३४) रा. कोंडुली ता. मानोरा जि. वाशिम असे मृताचे नाव आहे. तर मकसूद अली असे जखमीचे नाव असून त्याच्यावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मानोरा येथून सोयाबीन घेऊन ट्रक (एम.एच.३७-जे-२३२४) घुग्गुसकडे जात होता. त्याच वेळी वणीवरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक (एम.एच.३४-एचबी-७९१०) यवतमाळकडे जात होता. पाथरी गावाजवळ पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास दोनही ट्रक एकमेकांवर आदळले. अपघात एवढा भीषण होता की, किसना मेहडे हा चालक ट्रकमध्ये चरडल्या गेला. तर दुसऱ्या ट्रकचा चालक मकसूद अली हा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळताच ठाणेदार गुलाबराव वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजर्णे, सहायक पोलीस निरीक्षक भय्या पेंदोर, देवानंद मुनेश्वर यांनी घटनास्थळ गाठले. क्रेनद्वारे ट्रक बाजूला सारला असता किसनचा छिन्नविच्छिन्न मृतदेहच बाहेर काढावा लागला. या घटनेने वाहतूक खोळंबली होती. (वार्ताहर)
दोन ट्रकच्या धडकेत एक ठार
By admin | Updated: August 27, 2015 00:05 IST