वणी : तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बेलोरानजिक चार चाकी वाहन नाल्यात कोसळून एक जण ठार झाला. दुसऱ्या घटनेत वर्धा नदीत एक ट्रकही कोसळला. मात्र चालकाचे प्राण बचावले.वामन बोंबले, असे वाहन नाल्यात कोसळून ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतक वामन बोंबले हे घुग्गुस येथील रहिवासी आहेत. ते तालुक्यातील जुनाड येथील वेकोलिच्या कोळसा खाणीत नुकतेच फोरमन म्हणून पदोन्नत झाले होते. त्यांचे इतरही व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या मंगळवारी ते मुलीला सोडून देण्यासाठी घुग्गुस येथून नागपूरला गेले होते. तेथे मुलीला सोडून दिल्यानंतर ते वरोरा-वणीमार्गे परत जात होते. त्यावेळी सायंकाळ झाली होती. ते आपल्या एम.एच.३४-ए.ए.७२0६ या चार चाकी वाहनाने मंगळवारी सायंकाळी वणीवरून घुग्गुसकडे जाण्यासाठी निघाले. या मार्गावरील बेलोरानजिक एका नाल्याजवळ त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांचे वाहन सरळ त्या नाल्यात जाऊन कोसळले. यात वाहन पलटी झाले. त्यात वामन बोंबले दबले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र नाला खोल असल्याने ही घटना कुणाच्याही लक्षात आली नाही. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी मृत वामन बोंबले यांच्याविरूद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे. दुसऱ्या घटनेत बुधवारी वणीकडून जाणारा एक ट्रक बेलोरानजिकच वर्धा नदीच्या पात्रात कोसळला. हा ट्रकरिकामा होता. सुदैवाने या अपघातात ट्रक चालकाचे प्राण वाचले. या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान त्यानंतर हाय अलर्ट असल्याने पोलीस बंदोबस्तात होते. त्यामुळे अद्याप घटनास्थळावरून चार चाकी वाहन व ट्रक बाहेर काढण्यात आला नाही. शनिवारी क्रेन बोलावून ही वाहने बाहेर काढण्यात येणार असल्याचे शिरपूरचे ठाणेदार मनोज केंदारे यांनी सांगितले. या घटनेचा तपास शंकर राजगडकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
वाहन नाल्यात कोसळून एक ठार
By admin | Updated: August 1, 2015 03:43 IST