विक्रीकर भरण्यास टाळाटाळ : विवरणपत्र निरंक भरणाऱ्यांवर कारवाईयवतमाळ : विक्रीकर न भरणारे जिल्ह्यातील दीड हजार व्यापारी व बिल्डर विक्रीकर विभागाच्या रडारावर असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोट्यवधींचा व्यवहार करूनही निरंक विवरण पत्र भरणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील ६० व्यापाऱ्यांकडून पाच कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर विक्रीकर विभागाने फेब्रुवारीपर्यंत ११६ कोटी रुपयांची करवसुली केली आहे. दुष्काळी पस्थितीतही काही उद्योगामध्ये वर्षभरात मोठी उलाढाल झाली. मात्र दुष्काळी स्थितीची ढाल बनवित काही व्यापाऱ्यांनी मंदी दाखवित विक्रीकर विभागाला निरंक असा अहवाल पाठविला. जिल्ह्यात असे २६० व्यापारी आहे. ज्यांची उलाढाल लाखोंच्या घरात झाली आहे. या व्यापाऱ्यांनी कंपनीकडून साहित्य खरेदी केले. घाऊक व्यापाऱ्यांना विकले. त्यांच्याकडून मोठ्या व्यापाऱ्यांनी करासह पैसे वसूल केले. मात्र विक्रीकर विभागाचा करच भरला नाही. याची नोंद मुंबई कार्यालयात झाली. २६० व्यापाऱ्यांनी विक्रीकर विभागाला निरंक माहिती दिली. या व्यापाऱ्यांवर कारवाईच्या सूचना विक्रीकर आयुक्त मकरंद महाजन यांनी दिली आहे. जिल्ह्यात ६० व्यापाऱ्यांचा अशा पद्धतीने पर्दाफाश झाला असून व्यवहार बुकात विक्रीची नोंद केली होती. त्यांच्याकडून दंड आणि कर असे पाच कोटी रुपये विक्रीकर विभागाने वसूल केले आहे. मार्च एन्डींगच्या तोंडावर जिल्ह्यातील दीड हजार व्यापाऱ्यांनी कर भरला नाही. अशा व्यापाऱ्यांना विक्रीकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांना अल्टीमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत वसुली झाली नाही तर विक्रीकर विभाग व्यापाऱ्यांच्या बँक खात्यातून रक्कम वळती करणार असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. एप्रिलपासून ही मोहीम सुरू होणार आहे. (शहर वार्ताहर) केवळ १६ बिल्डर नोंदणीकृत शासनाच्या नियमात कर वाढविण्यासाठी काही फेरबदल झाले आहे. यामध्ये बिल्डर आणि डेव्हल्पर्सला एकूण उलाढालीच्या एक टक्का कर भरणे बंधनकारक केले आहे. बिल्डरांची उलाढाल हजार कोटींच्या घरात आहे. त्यानंतरही त्यांनी विक्रीकर विभागात नोंदणी केली नाही. जिल्ह्यातील केवळ १६ बिल्डर आणि डेव्हल्पर्स रजिस्टर आहे. विक्रीकर बुडविणाऱ्या बिल्डर आणि डेव्हल्पर्सची यादी तयार करण्याचे काम घेण्यात आले असून त्यांच्यावरही एप्रिलपासून कारवाई करण्यात येणार आहे.२०१३-१४ मध्ये जिल्ह्याला ११५ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दीष्ट दिले होते. यावर्षी हे उद्दीष्ट १२८ कोटींवर पोहोचले आहे. फेब्रुवारीपर्यंत ११६ कोटींच्या कराची वसुली झाली आहे.विक्रीकर विभागाच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. याच सुमारास उलाढाल दडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील अशा व्यापाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सर्व व्यापारी आॅनलाईन प्रक्रियेत जोडले आहे. - दिलीप सोनेवार, प्रभारी विक्रीकर आयुक्त, यवतमाळ
दीड हजार व्यापारी रडारवर
By admin | Updated: March 28, 2015 01:19 IST