नेर : नेर-कारंजा मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे विविध प्रकारचे वाहनधारक त्रस्त झाले आहे. ४५ किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी तब्बल दीड तासांचा वेळ लागतो. शिवाय किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सदर मार्गावर अनेक खेडे आणि मोठी गावे आहेत. या मार्गावर सोडल्या जाणाऱ्या जलद बसेसलाही अनेक ठिकाणी थांबा आहे. लोही हे गाव त्यातीलच एक आहे. येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बसची गती अतिशय कमी राहत असल्याने विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांना निर्धारित ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. या रस्त्याची डागडुजी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र वारंवार जैसेथे परिस्थती होते. यावरून डागडुजीच्या कामाचा दर्जा स्पष्ट होतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे काहींना प्राणही गमवावे लागत आहे. सदर मार्गावर बसेसची संख्या कमी असल्याने सोडल्या जाणाऱ्या बसेस प्रवाशांनी खचाखच भरल्या जातात. या स्थितीतही बस निश्चित ठिकाणी विनाविघ्न पोहोचेलच याची शाश्वती नसते. अनेकदा पंक्चर आणि नादुरूस्त होण्याचे प्रकार घडले आहेत. सदर रस्ता दुरूस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी संबंधित कार्यालयाचे आणि लोकप्रतिनिधींच्या घराचे उंबरठे झिजविले. परंतु काहीही उपयोग झाला नाही. याबाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. वर्दळीचा रस्ता असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी हा विषय गांभिर्याने घेत नाहीत. एसटी महामंडळी पाठपुरावा करत नाही. याचा त्रास मात्र नागरिकांना होतो. (तालुका प्रतिनिधी)
४५ किलोमीटरसाठी दीड तास
By admin | Updated: March 15, 2015 00:28 IST