पोफाळी : जादूटोण्याच्या संशयातून तालुक्यातील तरोडा येथील अंगणवाडी सेविकेच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी मात्र अद्यापही पसार आहे. दोघांना पोलीस कोठडी देण्यात आली तर महिला आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सकाळी ९ वाजता जादूटोण्याच्या संशयातून सुनंदा धबाले यांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या तिचा दीर जनानंद धबाले, आशा धबाले, मुलगा किरण धबाले आणि निरंजन धबाले यांनी केल्याची तक्रार दुसरा दीर किशोर धबाले यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी जनानंदला त्याच दिवशी अटक केली. इतर आरोपी मात्र पसार होते. मोबाईल लोकेशनवरून इतर आरोपींना पुसद तालुक्यातील अडगाव येथे अटक करण्यात आली. यावेळी आशाबाई धबाले व निरंजन धबाले आढळून आले. मात्र किरण धबाले पसार झाला आहे. जयानंद व निरंजन धबाले या दोघांना ८ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आशा धबाले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या हत्येचा तपास पोफाळी पोलीस करीत आहे. (वार्ताहर)
तरोडा हत्याप्रकरणातील एक आरोपी पसारच
By admin | Updated: May 6, 2015 01:53 IST