यवतमाळ : महावितरण वीजबिल भरण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक वीज ग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजारांच्या नोटा स्वीकारणार आहे. यासाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बिलापोटी स्वीकारण्यात येत आहेत. परंतु आगाऊ (अॅडव्हान्स) पेमेंट स्वीकारण्यात येणार नाही. वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे, यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह राज्यातील सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करतील. हे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या शिवाय ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ व मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.चार दिवसांत पावणेसहा कोटी वीज बिलापोटी यवतमाळ जिल्ह्यात केवळ चार दिवसात पावणेसहा कोटींच्या घरात रक्कम महावितरणकडे आली आहे. वीज बिलापोटी जिल्ह्यात एकूण पाच कोटी ७१ लाख बारा हजार रुपये ११ ते १४ नोव्हेंबर या चार दिवसांमध्ये नागरिकांनी वीज कंपनीकडे भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक दोन कोटी ४० लाख ९७ हजार रुपये यवतमाळ विभागात वसूल झाले. त्या पाठोपाठ पुसद विभागात एक कोटी ९३ लाख ५३ हजार रुपये तर पांढरकवडा विभागात एक कोटी ३६ लाख ६२ हजार रुपयांचा भरणा वीज ग्राहकांनी केला आहे.
वीज महावितरण स्वीकारणार २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा
By admin | Updated: November 17, 2016 01:25 IST