नेर : पंचायत समितीचा येथे ढिसाळ कारभार सुरू आहे. चिमुकल्या जिवांशी त्यांचा खेळ सुरू आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत केवळ एक नव्हे तर सहा अंगणवाडीतील चिमुकले बसविले जातात. थोडाही वारा आला तर कवेलू अंगावर पडतात. या भीषण परिस्थितीकडे पंचायत समितीचे सुरू असलेले दुर्लक्ष नागरिकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरत आहे. कधी काळी बांधल्या गेलेल्या इमारतीत अंगणवाडीतील चिमुकले बसतात. या इमारतीवरील कवेलूचे तुकडे पडले आहे. भिंतींना भेगा पडलेल्या आहेत. कशी तरी तग धरून असलेली ही इमारतही पंचायत समितीला कमी पडली आहे. साध्या वाऱ्यानेही त्यावरील कवेलूचे तुकडे विद्यार्थ्यांच्या अंगावर पडतात. ही बाब संबंधितांच्या वारंवार निदर्शनास आणून देण्यात आली. परंतु कुणीही गांभीर्याने घेतले नाही. अंगणवाडीच्या इमारतीसाठी मागील दहा वर्षांपूर्वी निधी प्राप्त झाला. परंतु पंचायत समितीने जागा उपलब्ध करून दिली नाही. अखेर निधी परत गेला. आता कोंडवाड्यापेक्षाही भीषण स्थितीत चिमुकले विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. इमारतीचे सडके लाकूड केव्हाही पडून मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर इमारत जीर्ण झाल्यामुळे पंचायत समितीच्या निवासस्थानांमध्ये अंगणवाडी भरविली जावी, अशी सूचनाही मांडण्यात आली होती. यावरही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून अंमल झालेला नाही. यावरून पंचायत समिती किती उदासीन आहे हे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)पंचायत समिती सभापती हतबलअंगणवाडीच्या इमारतीविषयी पंचायत समिती सभापती भरत मसराम यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका, अशी विनंतीही त्यांनी केली. यानंतरही अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी पदाधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जावे, अशी सूचनाही केली होती. अंगणवाडीसाठी आलेला निधी परत जाण्यास जबाबदार असलेल्या अभियंत्यावर कारवाईची मागणी करून तसा ठराव जिल्हा परिषदेकडे पाठविला जाणार असल्याचे सभापती मसराम यांनी सांगितले.
अंगणवाडी भरते जीर्ण इमारतीत
By admin | Updated: September 5, 2015 02:53 IST