उधारीवर तडजोड : पावणेतीन लाख विद्यार्थ्यांच्या ताटातील खिचडी गायबयवतमाळ : कंत्राटदाराने डिसेंबरपासून तांदूळाचा पुरवठा न केल्याने जिल्ह्यातील पावणेतीन लाख विद्यार्थ्यांच्या ताटातील पोषण आहार गायब झाला आहे. खिचडीअभावी विद्यार्थ्यांना उपाशीपोटी शाळेतून घरी परत जाण्याची वेळ आली आहे. वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. विद्यार्थ्यांना दररोज शाळेतच खिचडी शिजवून दिली जाते. त्यासाठी लागणारा तांदूळ केंद्र शासनाकडून पुरविला जातो. याशिवाय डाळ, तेल, हळद, मीठ, मसाला, लसूण, कांदा याचा पुरवठासुद्धा केला जातो. परंतु तांदूळ व अन्य किराणा साहित्याचा पुरवठा कराराअभावी प्रभावित झाला आहे. तांदूळ व अन्य साहित्य पुरवठ्याचा वार्षिक करार केला जातो. मात्र गेल्या वर्षभरापासून हा करार न करता दरमहिन्याला पुरवठादाराला मुुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळेच कराराला विलंब पर्यायाने आहार पुरवठ्याला विलंब होतो आहे. फेब्रुवारीचा करार ४ तारखेला झाला. त्यानंतर २० दिवसांत धान्य पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र नागपूर येथील अग्रवाल नामक कंत्राटदाराकडून शाळांना वेळीच धान्य पुरवठा केला न गेल्याने शाळांमधील आहाराचे तांदूळ व किराणा संपला आहे. पर्यायाने खिचडी शिजवायची कशी, असा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे. कंत्राटदाराने डिसेंबरमध्ये तांदळाचा पुरवठा केला होता. तो तांदूळ संपला आहे. नव्या तांदळाचा पुरवठा केव्हा होतो, याकडे शाळांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये तांदूळ व किराणा पोहोचला नाही. शहरी शाळांमधूनही तांदूळ गायब झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी खिचडी शिजविण्यासाठी चुली पेटल्या नसल्याची ओरड ऐकायला मिळते. काही शाळांनी आपल्या स्तरावर तडजोड करून तांदूळ व किराण्याची उधारीवर व्यवस्था केली. पाच-दहा किलोमीटरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी खाऊ न घालता उपाशी कसे पाठवायचे, असा सवाल एका शिक्षकाने ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. कंत्राटदाराने पुरवठा केला नसेल तर शिक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकानांमधून तात्पुरती तांदूळ पुरवठ्याची व्यवस्था करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया या शिक्षकाने व्यक्त केली.नवे कंत्राट मार्केटींग फेडरेशनला शिक्षण विभागाच्या सूत्राने सांगितले की, तांदूळ व किराणा पुरवठ्याबाबत एक वर्षाच्या कराराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांचे नमुनेही तपासले गेले आहे. मार्चपूर्वी हा करार पूर्ण होवू शकतो. आतापर्यंत कंत्राटदाराला मुदतवाढ देऊन आहार पुरवठा केला गेला. मार्केटींग फेडरेशन हे मुख्य कंत्राटदार असून त्यांनी प्रत्यक्ष पुरवठ्यासाठी राज्यभर आपले सब डिलर नेमले आहे. यवतमाळ जिल्ह्याला नागपूरच्या अग्रवाल नामक कंत्राटदाराकडून धान्य पुरवठा केला जातो. (जिल्हा प्रतिनिधी)दुष्काळामुळे उन्हाळ्यातही मिळणार खिचडीसंपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. सोळाही तालुक्यांची पीक पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी निघाली आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यातसुद्धा विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये खिचडी शिजविली जाणार आहे. उन्हाळ्यात विद्यार्थीसंख्या रोडावत असल्याने किमान ३० टक्के उपस्थिती ग्राह्य मानून शासनाकडे खिचडीच्या तांदूळ व किराण्याची मागणी नोंदविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या ८१ टक्के विद्यार्थ्यांना खिचडीचा लाभ दिला जात आहे.
पोषण आहाराचा तांदूळ संपला
By admin | Updated: February 14, 2016 02:14 IST