नेर : निवासस्थानाच्या दुरुस्तीविषयी अधिकाऱ्यांकडे वारंवार सूचना करूनही दखल घेतली गेली नाही. अखेर सभापतीला दयनीय स्थितीत असलेल्या घरात राहावे लागले. ही बाब ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच गटविकास अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची झाडाझडती केली. त्यामुळे भांबावलेला रोखपाल चक्कर येवून खाली पडला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सभापती निवासस्थानाच्या दुरावस्थेविषयी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विचारणा करत तत्काळ डागडूजी करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे सदर निवासस्थानामधील हजारो रुपयांचे फर्निचरही बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. या ठिकाणी जे काही फर्निचर आहे ते जागोजागी तुटले आहे. शुद्ध पाण्याची सोय नाही. विशेष म्हणजे या निवासस्थानाचा वीज पुरवठा तोडल्याने उसणी वीज घेऊन वेळ भागवली. ही बाब ‘लोकमत’ने मांडताच आरोग्य विभागाने निवास्थानाची वीज काढून टाकली. दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी सभापती निवासस्थानाची पाहणी केली. लाईट आणि इतर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. या प्रकारातच एक कर्मचारी आजारी पडला. एका माजी सभापतीने वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. या निवासस्थानातील एक सोफा, रॅक आणि किचनमधील भांडी लंपास झाली. ती कोणी नेली, या बाबीची माहिती पंचायत समितीला नाही. सभापती भरत मसराम यांनीही प्रशासनातील कारभाराविषयी रोष व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)
नेर बीडीओंकडून कर्मचाऱ्यांची झाडाझडती
By admin | Updated: November 19, 2014 22:48 IST