यवतमाळ : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची निवडणूक घोषित झाल्याने राजकीय धुळवड सुरू झाली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षांतरालाही वेग आला आहे. इच्छुक उमेदवारीसाठी चाचपणी करीत असून उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या पक्षाचे दार ठोठावताना दिसत आहे. जिल्ह्यात यवतमाळसह वणी, पुसद, दिग्रस, दारव्हा, उमरखेड, घाटंजी आणि आर्णी नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. उमेदवारी दाखल करण्याचा मुहूर्त अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अद्याप राजकीय पक्षांनी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची घोषणा केली नाही. केवळ शिवसेनेने यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी कांचन बाळासाहेब चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. उर्वरित पक्षांना तेसुद्धा जमले नाही. जवळपास सर्वच पक्षांत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची रिघ लागली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या चार प्रमुख पक्षांसह मनसे, बसपा, एमआयएम, विविध आघाड्या, युत्या या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी मुलाखती घेण्याचा फार्स सुरू केला आहे. यातून प्रभागातील उमेदवार निश्चित केले जातील, असे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात अनेक पक्षांचे उमेदवार आधीच ठरतात, असा सामान्य कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. हा अनुभव गाठीशी बांधून काही पक्षांतील संभाव्य इच्छुक आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळणार नाही, असे गृहित धरून दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डींग लावून आहे. यामुळे दुसऱ्या पक्षांतील निष्ठावान कार्यकर्ते तिसऱ्या पर्यायाच्या शोधात दिसत आहेत. यामुळे पुढील काळात पक्षांतराचे लोण पसरण्याची शक्यता बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)
उमेदवारीसाठी पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढली
By admin | Updated: October 23, 2016 02:07 IST