जिल्हा परिषद : विषय समितीच्या सभेत निर्णय यवतमाळ : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील प्रशासकीय कामकाज मराठीतूनच करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बांधकाम समितीच्या सभेत घेण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कामकाजाची माहिती मिळविणे सुलभ होणार आहे. यातून कामाच्या दर्जावरही ग्रामस्थांना लक्ष ठेवता येणार आहे. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती सुभाष ठोकळ यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. बैठकीमध्ये मिलिंद धुर्वेसह काही सदस्यांनी बांधकाम विभागाच्या कामकाजी भाषेवर आक्षेप घेतला. बरेचदा निविदा प्रक्रिया आणि प्राकलने, कृती आराखडा हा इंग्रजीत असल्याने गावपातळीवरच्या लोकप्रतिनिधींना तो समजत नाही. ही अडचण लक्षात घेऊन या पुढे बांधकाम विभागाचे संपूर्ण कामकाज मराठीतून केले जावे, असा प्रस्ताव ठेवला. याला सभापती सुभाष ठोकळ यांनी अनुमोदन देऊन तशी नोंद बैठकीच्या पुस्तकामध्ये घेण्याचे निर्देश दिले. यावेळी काही अभियंत्यांनी इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नसल्याची सबब पुढे केली. यावर सभापती ठोकळ यांनी असे शब्द इंग्रजीतच परंतु देवनागरी लिपीत लिहिण्याची सूचना केली. त्यानंतर बैठकीमध्ये ५०-५४ च्या कामांवरही चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा परिषदेचे रस्ते मागविण्यात आले. मात्र याला सर्वसाधारण सभेतच विरोध करण्यात आला. त्यामुळे बैठकीतही या मुद्यावर सर्वांनी विरोध नोंदविला. मराठी भाषेच्या आग्रहामुळे बांधकामाचा दर्जा सुधारण्याला मदतच होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आता बांधकामचे कामकाज मराठीत
By admin | Updated: July 18, 2015 02:28 IST