गर्दी वाढली : अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात व्यवहार, दोन हजारांचे २० कोटींचे चलन बँकांमध्ये दाखल यवतमाळ : जिल्ह्यातील बहुतांश एटीएम शुक्रवारी सुरू झाले आहेत. परंतु पैसे काढण्यासाठी नागरिकांनी कालच्या तुलनेत आज जास्त गर्दी केल्याने एटीएम व बँकांसमोर लांबच लांब रांगा आजही कायम दिसून आल्या. हजार व पाचशेंच्या नोटा बदलून देण्यासाठी तब्बल ५० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. परंतु व्यवहार करण्यासाठी नागरिकांना होत असलेली अडचण पाहता बँकांमध्ये गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मोठी गर्दी दिसून आली होती. येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील गर्दी पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या उपाय-योजना करण्यात आल्या होत्या. स्टेट बँकेत नियमित ग्राहकांसोबतच नोटा बदलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. विड्रॉल आणि पैसे जमा करण्यापेक्षा नोटा बदलून घेण्यावर सध्या नागरिकांचा जोर आहे. जेणेकरून छोटे-मोठे व्यवहार अडू नये. शासनाकडून बँकांच्या वेळा वाढवून देण्यात आल्या आहेत, परंतु अनेक खासगी बँकांकडील कॅश संपल्याने त्यांनी दुपारीच काऊंटर बंद करून दिले, त्यामुळे अनेकांना दोन ते तीन तास रांगेत ताटकळत राहल्यानंतरही पैसे मिळू शकले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. काल पहिल्या दिवशी गर्दी असेल या भितीने नागरिकांनी संयम बाळगला, परंतु आज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यातच पेट्रोल पंप, काही रुग्णालये व बाजारपेठेत गुरुवारी काही प्रमाणात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चालल्या. आजा मात्र अशा ठिकाणीसुद्धा चिल्लर नसल्याच्या सबबीखाली हजार पाचशेंच्या नोटा स्वीकारायला कुणीही तयार नव्हते. अनेकांनी या नोटाच स्वीकारा लागू नये म्हणून आपली प्रतिष्ठानेच बंद ठेवली. काही दुकानदार व हॉटेलमध्ये ‘येथे हजार व पाचशेंच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत’ असे फलकच लावण्यात आले, या सर्व बाबींचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. काही लोकांकडे चिल्लर असूनही ते शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून हजार व पाचशेंच्या नोटा स्वीकारत नसल्याचे चित्र यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. शनिवार व रविवारीसुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी बँका सुरू राहणार आहेत. एकंदरीत संपूर्ण परिस्थिती सुरळीत होण्यास दहा ते बारा दिवस लागतील, असे मत काही बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
बँक, एटीएमसमोर दुसऱ्या दिवशीही रांगा
By admin | Updated: November 12, 2016 01:38 IST