दिग्रस : सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद व महसूल यांच्या संयुक्तपणे बुधवारपासून सुरू करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. येथील जुना पेट्रोलपंप ते शंकर टॉकीज व शंकर टॉकीज ते मानोरा चौक परिसरातील अतिक्रमण बुलडोझर व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हटविण्यात आले. गुरुवारी तहसील व पंचायत समिती परिसरातील अतिक्रमण हटविले. तहसील व पंचायत समितीसमोरील जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने या पूर्वीच जिल्हा परिषदेला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी असल्याखेरीच त्या परिसरातील अतिक्रमण हटवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद अधिकारी दीपक येळणे आर्णी येथून आल्यावर नव्याने आखणी करण्यात आली व दुपारनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांना आगाऊ कल्पना असल्याने त्यांनी स्वत:हून आपले शक्य ते अतिक्रमण स्वत:च काढले होते.यावेळी तहसीलदार नितीन देवरे, मुख्याधिकारी विठ्ठल कुमरे, सार्वजनिक बांधकामचे एम.एन. माथूरकर, दयाराम पवार आदींसह संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम
By admin | Updated: June 5, 2015 00:16 IST