यवतमाळ : जिल्हा शिवसेनेत नेतृत्व बदल होताच आता त्यांची नवी टीमही लवकरच जाहीर होणार आहे. मंगळवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीतून तसे संकेत प्राप्त झाले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख पदी माजी आमदार विश्वास नांदेकर व संतोष ढवळे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर नव्या जिल्हा प्रमुखांची ओळख करून घेण्यासाठी मंगळवारी शासकीय विश्रामभवनात खासदार भावना गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुखांचा यात समावेश होता. आगामी काळात ग्रामीण भागात शिवसेना गावागावात वाढविण्याच्या सूचना दिल्या गेल्या. दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायती हे शिवसेनेचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहेत. त्यानंतर येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुकांच्या दृष्टीने आतापासूनच ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचे निर्देश दिले गेले. जुन्या शाखा सक्रिय करणे, नवीन शाखा स्थापन करणे व सदस्य नोंदणी वाढविणे यावर भर दिला जाणार आहे. नव्या जिल्हा प्रमुखांची नवी टीम तयार होणार आहे. त्यात अनेक ठिकाणी उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख बदलण्याची तयारी केली जात आहे. तत्पूर्वी त्यांची ग्रामपंचायत निवडणुकीतील उपलब्धी तपासली जाणार असून नियुक्ती केव्हा झाली व तेव्हापासून त्यांनी पक्षासाठी नेमके काय काम केले याचे मूल्यमापन केले जाणार आहे. आगामी बैठकीत या पदाधिकाऱ्यांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १४ उपजिल्हा प्रमुख आहेत. मात्र त्यांची संख्या सहाने कमी करून सात विधानसभा मतदारसंघाचे प्रत्येकी एक या प्रमाणे सात व एक निवासी असे केवळ आठ उपजिल्हा प्रमुख राहणार आहे. विद्यमान १४ पैकी कोणत्या सहा उपजिल्हा प्रमुखांना डच्चू मिळतो, याकडे लक्ष लागले आहे. निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना बाजूला सारुन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मानस संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांनी यापूर्वीच बोलून दाखविला. त्यांच्याच ट्रॅकवर आता नवे जिल्हा प्रमुख आपली टीम तयार करणार असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)
शिवसेनेच्या नव्या जिल्हा प्रमुखांची नवी टीम लवकरच
By admin | Updated: July 16, 2015 02:30 IST