शोकांतिका : शुद्ध पाणीही नशिबी नाही, घराचा परिसर बकालकिशोर वंजारी - नेरतालुक्याच्या ग्रामीण भागाचा विकास करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर येवून पडली त्यांनाच उसनी वीज घेऊन दिवस काढावे लागते, असे म्हटल्यास विश्वास बसणार नाही. पण ते सत्य आहे. नेर पंचायत समितीचे सभापती भरत मसराम यांच्या शासकीय निवासस्थानाची ही दैना आहे. त्यांच्या नशिबी शुद्ध पाणी आणि स्वच्छ परिसरही नाही. अतिशय सामान्य कुटुंबातून लोकप्रतिनिधी झालेल्या या व्यक्तीपुढे आता आपला प्रश्न मांडावा कुणाकडे याची चिंता आहे. लोकांच्या सेवेसाठी लोकप्रतिनिधी झालेल्या मसराम यांना आपल्याच समस्या सोडवून घेताना नाकीनऊ येत आहे. अधिकारी, कर्मचारी ऐकत नाही. पद सांभाळून महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतरही त्यांना सभापतींना साजेसे असे घर मिळाले नाही. घरात असलेला कॉट तुटलेला आहे, पाण्याच्या टाक्या फुटलेल्या आहेत, बिलाचा भरणा केला नसल्याने कंपनीने वीज तोडली, घराची दयनीय अवस्था झाली आहे, नळ बंद असल्याने पाण्यासाठी फिरावे लागते.वीज पुरवठा तोडल्याने त्यांना काही दिवस दिव्याच्या उजेडात काढावे लागले. आता शेजारी असलेल्या आरोग्य विभागाच्या कार्यालयातून वायर टाकून वीज घेतली आहे. घराच्या परिसराला उकीरड्याचे स्वरूप आले आहे. स्वच्छतेसाठी पंचायत समिती प्रशासनाने थोडाही हात पुढे केला नाही. सभापतींनी आपली ही व्यथा गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडली. पण, त्यांनी सभापतींची ही व्यथा या कानातून ऐकून त्या कानातून सोडून दिली. आता या सभापतींना चांगल्या घरासाठी आंदोलन करावे लागू नये म्हणजे झाले.
नेर सभापतींच्या घरात उसना उजेड
By admin | Updated: November 17, 2014 23:01 IST